सोलापुरात 15 हजार किलो प्लास्टिक जप्त 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 31 जुलै 2019

शहराच्या काही दुकानांतून प्लास्टिकचा वापर सर्रास सुरुच असून, बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री बिनधास्त सुरु असल्याचे दिसून येत आहे. 

सोलापूर : महापालिकेतील परवाना विभागाने गेल्या 13 महिन्यांत शहरातील 10 हजार 115 दुकांनांवर धाडी घातल्या आणि 15 हजार 122 किलो प्लास्टिक जप्त केले. दरम्यान शहराच्या काही दुकानांतून प्लास्टिकचा वापर सर्रास सुरुच असून, बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री बिनधास्त सुरु असल्याचे दिसून येत आहे. 

परवाना विभागातील विशेष पथकाने काल राबविलेल्या मोहिमेत रविवार पेठ, जोडभावी पेठ, अशोक चौक, नवी पेठ परिसरातील सहा दुकांनामध्ये प्लास्टिक आढळले. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे दंड वसूल करण्यात आला. तसेच सात रस्ता परिसरातील भाजी व फळविक्रेत्यांकडून प्लास्टिक जप्त करण्यात आले आणि त्यांना तंबी देण्यात आली. पुन्हा प्लास्टिक वापरल्यास दंड वसूल केला जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. अधीक्षक श्रीराम कुलकर्णी, निरीक्षक केदार गोटे, महादेव शेरखाने, लोखंडे व त्यांच्या सहकार्यानी ही कारवाई केली.

उत्सवाचे दिवस सुरु होत आहेत. त्यामध्ये गणेशोत्सव, बकरीईद, मोहरम, नवरात्रोत्सव आणि दिवाळीचा समावेश आहे. या कालावधीत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात बंदी असलेले प्लास्टिक येते. त्यामुळे महापालिकेच्या पथकाला या कालावधीत जागरूक रहावे लागणार आहे. विशेषतः हे प्लास्टिक कर्नाटकमधून येत असल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर, एसटी आणि रेल्वे स्थानकावरही तपासणी केली जाणार आहे. 

महापालिकेत सुमारे 74 जणांचे पथक या कामासाठी आहे. त्यांच्या सहकार्याने महत्त्वाच्या नाकाबंदीची ठिकाणे, महाराष्ट्र कर्नाटक सीमा आणि एसटी व रेल्वे स्थानकाच्या परिसरात तपासणी पथक नियुक्त केले जाईल. 
- श्रीराम कुलकर्णी, अधीक्षक, परवाना विभाग, महापालिका 

अशी झाली कारवाई 
कालावधी ः 23 जून 2018 ते 30 जुलै 2019 
दुकाने तपासली ः 10,115 
दंडात्मक कारवाई ः 206 
प्लास्टिक जप्त ः 15, 122 किलो 
प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेला दंड ः 45 हजार रुपये 
महापालिकेने केलेला दंड ः 10 लाख 45 हजार 
दंडाची एकूण वसूल रक्कम ः 10 लाख 90 हजार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15000 kg plastic seized from solapur