स्वाइन फ्लूचा विळखा घट्ट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

818  - स्वाइन फ्लू संशयित 
101  - स्वाइन फ्लू निदान 
18  - अलगीकरण वॉर्डमध्ये बेड 
26 -  मेडिकलमध्ये टॅमी फ्लू गोळ्या 

सातारा - मृत्यूचे दार असलेल्या स्वाइन फ्लूने जिल्ह्यातील 16 नागरिकांचा या वर्षात बळी घेतला असून, आजवर 101 नागरिकांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यात तब्बल 25 हजार गर्भवती असून, अतिजोखमीच्या व्यक्‍तींची संख्याही अधिक आहे. तरीही अवघ्या दीड हजार प्रतिबंधात्मक लसींची मागणी आरोग्य विभागाने केली आहे. केवळ कागदोपत्री "उपाय'योजना करण्यात आरोग्य विभाग गुंतल्याचा आरोपही होत आहे. 

स्वाइन फ्लूचा विळखा अधिक घट्ट होऊ लागल्याने जिल्ह्याचे "आरोग्य' धोकादायक स्थितीत निघाले आहे. येथील सैनिक स्कूलमध्ये दोन विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे समोर आले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव या शाळेच्या व्यवस्थापनाने सुटी दिली आहे. वातावरण खराब असल्याने अनेक विद्यार्थी थंडी, ताप, खोकला, सर्दीने आजारी आहेत. परिणामी, पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आजारी असल्याने अनेक मुले शाळांमध्ये जात नाहीत, अशी स्थिती जिल्हाभर दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी मार्चमध्ये 15 हजार 265 रुग्णांची तपासणी केली असल्याचे सांगितले. सध्या जिल्ह्यात 117 रुग्ण दाखल असताना जिल्हा रुग्णालय वगळता कोठेही अलगीकरण वॉर्ड उपलब्ध करण्यात आले नाहीत. टॉमी फ्लूच्या गोळ्या पुरेशा उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. 

गर्भवती महिला, अतिजोखमीच्या व्यक्‍तींना (मधुमेहग्रस्त, किडनी, हृदयरोगी, प्रतिकार क्षमता कमी असलेले) प्रतिबंधात्मक लस देणे आवश्‍यक असते. वास्तविकता मात्र जिल्हा रुग्णालयात सध्या ही लस उपलब्ध नाही. जिल्ह्यात सुमारे 25 हजार गर्भवती महिला आहेत, अतिजोखमीच्या व्यक्‍ती असतानाही त्याची दखल न घेता जिल्हा रुग्णालयाने केवळ दीड हजार लसींची मागणी केली आहे, यावरून आरोग्य विभागाचे "गांभीर्य'च दिसत आहे. 

शहरी भागाला विळखा  
सातारा शहर व शाहूपुरी, प्रतापसिंहनगर, कोडोली, शाहूनगर या परिसरात 101 पैकी 71 स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. साताऱ्यातील मल्हारपेठेत एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याने तेथील नागरिकांची तपासणी केल्याचे आरोग्य विभाग सांगत आहे. वास्तविकता मात्र तेथील अनेक लोकांना ही तपासणी कधी झाली, हेच माहिती होत नाही. यावरून प्रशासनातील "लावलिजाव' कारभार दिसून येत आहे. 

संजीवराजेंच्या सूचना  
सैनिक स्कूलमधील माहिती तुमच्याकडे यायला पाहिजे. तुमच्याकडे येणार नसेल तर त्यांच्यावर कारवाई करा. खासगी रुग्णालयांना अलगीकरण वॉर्ड उपलब्ध करण्याच्या सूचना द्याव्यात, अतिजोखमीच्या व्यक्‍तींना लस देण्यासाठी जादा प्रतिबंधात्मक लसींची मागणी करा, अशा सूचना संजीवराजेंनी डॉ. गडीकर यांना दिल्या. 

""जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाच्या समस्यांबाबत तत्काळ बैठक घेणार आहे. आरोग्य विभागाने स्वाइन फ्लूबाबत गांभीर्याने उपाययोजना राबवाव्यात. खासगी डॉक्‍टरांनी स्वाइन फ्लूच्या रुग्णांबाबतची माहिती तातडीने आरोग्य विभागाला द्यावी.'' 
- डॉ. कैलास शिंदे 

Web Title: 16 people died in Satara district due to swine flu