टॅंकरमुक्‍त सांगलीत यावर्षी १८८ टॅंकर सुरू

टॅंकरमुक्‍त सांगलीत  यावर्षी १८८ टॅंकर सुरू

सांगली - कोपलेला सूर्य...तापलेली जमीन...पाण्यासाठी वणवण आणि जनावरांसाठी चारा नाही. अशा दुष्काळात माणसांचीही होरपळ होते आहे...हे वर्णन आहे. कृष्णाकाठच्याच सांगली जिल्ह्यातले! सिंचन योजना, जलसंधारणाची कामे यांमुळे एक काळ टॅंकरमुक्‍त म्हणून, तसेच जलयुक्‍त शिवारात राज्यात पहिला क्रमांक पटकावलेल्या या जिल्ह्यात पुन्हा एकदा तब्बल १८८ टॅंकर सुरू झाले आहेत.

जिल्ह्याचा पूर्व भाग यंदाही दुष्काळाच्या असह्य झळांनी त्रासला आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची वाटचाल द्विशतकाजवळ म्हणजे १८३ झाली आहे.  गेल्या चौदा वर्षांत दोनशेवर टॅंकर जाण्याची ही तिसरी वेळ आहे. सन २००४ (२९६ टॅंकर), सन २०१२ (२६६ टॅंकर), २०१३ (२६५ टॅंकर) नंतर यंदाच टॅंकरच्या संख्येने दोनशेचा टप्पा गाठला आहे.  

जिल्ह्यात २००० मध्ये भीषण दुष्काळ होता, पण त्यानंतर सलग सहा वर्षे पूर आला आणि पाणीच पाणी अशी  स्थिती होती. त्यामुळे एकेकाळी येथे अडीचशेहून  अधिक टॅंकर पाण्यासाठी चकरा मारत असतं, पण गेल्या काही वर्षांत प्रशासनाने सांगली जिल्हा टॅंकरमुक्‍त झाल्याची दोनदा घोषणा केली. यंदा तर जलयुक्‍त शिवारमध्ये सांगली जिल्ह्यात राज्यात पहिला आला आहे. असे असतानाही येथील पाच तालुक्‍यांतील परिस्थिती बिकट आहे.

येथे दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. तरीपण सहा तालुक्‍यांमधील १८१ गावांतील १ हजार १३६ वाड्यांना १८८ टॅंकरद्वारे ३.७६ लाख लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही, शेती पिकली नाही, जी पिके होती तीही करपून गेली आहेत, हाताला काम नाही, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ही माणसांची अवस्था तर जनावरांची त्याहून बिकट...सध्या दहा चारा छावण्यांना मंजुरी दिली असून पाच छावण्या सुरू झाल्या आहेत.  

व्हॉटस्‌ॲपवरील तक्रारींची दखल घेणार...
चारा छावण्या, टॅंकर, नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्तीबाबींच्या तक्रारींची तसेच जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या व्हॉटस्‌ॲपवर येणाऱ्या तक्रारींची तत्काळ  दखल घेऊन कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नुकतेच दिले आहेत. व्हॉटस्‌ॲप तक्रारीसाठी १७ क्रमांक उपलब्ध आहे. राज्यात १३ मे पर्यंत ४,४५१ तक्रारी दाखल झाल्या आहेत.  

पाणी योजनांसाठी ४ कोटी निधी 
पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणासाठी जिल्ह्यात आजअखेर १६ विंधन विहिरी, ९६ विहिरींचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात येत आहे. थकीत विद्युत देयकामुळे बंद पडलेल्या नळपाणी पुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी ३.८८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून त्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

तालुकानिहाय टॅंकर...
जत- १०९ टॅंकर, कवठेमहांकाळ- १४ टॅंकर, तासगाव- १३ टॅंकर, मिरज- ४ टॅंकर, खानापूर-१३ टॅंकर, आटपाडी- ३५ टॅंकर, ५१ हजार १३५ पशुधन संख्येला पाणी पुरवठा केला जातोय. जिल्ह्यात एकूण ९६ खासगी विहिरी, कूपनलिका अधिग्रहीत केल्या आहेत. 

गेल्या १६ वर्षांतील टॅंकरचा आढावा
सन २००४-२९६, सन २००५-२७, सन २००६-२३, सन २००७- ४३, सन २००८-१०१, सन २००९-४२, सन २०१०-०००, सन २०११-०००,सन २०१२-२६६, सन २०१३-२६५, सन २०१४- ०४, सन २०१५- ३१, सन २०१६- ८९, सन २०१७- ११३, सन २०१८- ०३, सन २०१९- सोमवार अखेर...१८३. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com