सांगली "कोरोना वॉर रुम' ला मोठा धक्का 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कोरोना वॉर रुमला आज आणखी मोठा धक्का बसला. येथील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता वीसवर पोहोचली. या बाधितांतील बहुतेकांना घरीच क्वारंटाईन करून उपचार सुरु करण्यात आले आहेत. जास्त लक्षणे दिसत असलेल्या काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सांगली ः जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कोरोना वॉर रुमला आज आणखी मोठा धक्का बसला. येथील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता वीसवर पोहोचली. या बाधितांतील बहुतेकांना घरीच क्वारंटाईन करून उपचार सुरु करण्यात आले आहेत. जास्त लक्षणे दिसत असलेल्या काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

कोरोना वॉर रुम ही जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेते. ही अत्यंत प्रभावी यंत्रणा ठरली असून त्याची राज्यभर दखल घेतली गेली होती. या ठिकाणी एका साथरोग नियंत्रण विभागातील डॉक्‍टरांना कोरोनाची लागण झाली. त्यांची पत्नी आणि मुलगा बाधित आले. त्यामुळे येथे थोडे भितीचे वातावरण होतेच, ते आज खरे ठरले. पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी पाच आणि आज 14 असे 20 जण कोरोना बाधित आले आहेत. त्यामुळे एकूणच जिल्हा परिषदेत भितीचे वातावरण पसरले आहे. 
या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. ज्यांच्या घरी दोन शौचालयांची सोय आहे, त्यांना घरीच थांबून उपचार घेण्यास सांगण्यात आले आहे. इतरांना संस्था क्वारंटाईन केले आहे, असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी सांगितले. 

दरम्यान, कोरोना वॉर रुमचे काम न थांबता सुरु ठेवण्यात आले आहे. या कक्षाला दररोज सॅनिटराईझ केले जात आहे. तेथे नवीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. 

 

""कोरोना बाधित कर्मचाऱ्यांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. ज्यांना अत्यंत महत्वाचे काम आहे, अशी लोकांनीच जिल्हा परिषदेत यावे. सहज कुणीही फिरकू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.'' 
-प्राजक्ता कोरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 corona positive in sangli corona war room