सांगलीत एटीएम कस्टोडियनकडून 20 लाखांचा घोटाळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

  • बॅंकांच्या एटीएममध्ये भरणा करण्यासाठीची रक्कम न भरता 20 लाख रूपये परस्पर केले लंपास.
  • संशयित एटीएम "कस्टोडियन' जितेंद्र सतीश जगताप (रा. 147, गवळी गल्ली, गणपती पेठ, सांगली) याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलिसात गुन्हा.

सांगली - बॅंकांच्या एटीएममध्ये भरणा करण्यासाठीची रक्कम न भरता 20 लाख रूपये परस्पर लंपास केल्याप्रकरणी संशयित एटीएम "कस्टोडियन' जितेंद्र सतीश जगताप (रा. 147, गवळी गल्ली, गणपती पेठ, सांगली) याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी "सीएमएस इन्फो सिस्टीम लि. कंपनी' चे शाखाधिकारी शिवदत्त तुकाराम म्हांगोरे (वय 34, रंकाळा बसस्थानकजवळ, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक माहिती अशी, "सीएमएस इन्फो सिस्टीम लि. कंपनी' कडे सांगली शहर, मिरज, कवठेमहांकाळ, कुपवाड एमआयडीसी परिसरातील विविध बॅंकांच्या एटीएममध्ये रोकड भरण्याची जबाबदारी सोपवली आहे. मार्केट यार्डाजवळील अष्टेकर
बिल्डिंगजवळ कंपनीचे ऑफीस आहे. संशयित जितेंद्र जगताप हा कंपनीमध्ये गेली 13 वर्षे एटीएम कस्टोडियन म्हणून कार्यरत आहे. त्याच्याकडे सांगली, मिरज, कुपवाड, कवठेमहांकाळ परिसरातील 11 एटीएम मध्ये रोकड भरण्याची जबाबदारी
आहे.

कंपनीने एटीएम मध्ये भरणा केलेल्या रकमेची हिशोब पडताळणी प्रत्येक महिन्याला होत असते. 25 जुलै 2019 ते 31 ऑगस्ट 2019 या महिना भराच्या काळात सांगली - मिरज परिसरातील एटीएम मध्ये भरणा केलेल्या रकमेमध्ये 20
लाखाचा अपहार झाल्याचे पडताळणीमध्ये स्पष्ट झाले. त्यामुळे कंपनीने कस्टोडियन जगताप याच्याकडे चौकशी केली. चौकशीमध्ये त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पाच दिवस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. तसेच कागदपत्रे संकलित केली. त्यांच्या चौकशीत जगताप याने रोकड एटीएम मध्ये भरणा न करता परस्पर लंपास केल्याचे स्पष्ट झाले आहे.

कंपनीचे शाखाधिकारी शिवदत्त म्हांगोरे यांनी गुरूवारी रात्री उशिरा विश्रामबाग पोलिसात जगताप विरूद्ध फिर्याद दिली. त्यानुसार जगतापविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 Lakhs Rs ATM Fraud in Sangli