पंढरपूर : 20 हजार एकर ऊसाचे क्षेत्र पुराच्या पाण्यात!

भारत नागणे
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता असतानाच पुणे आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे भीमा आणि नीरा नदीला पूर आला होता. पुराच्या पाण्यामुळे पंढरपूर तालुक्यात भीमानदी पूररेषा ओलांडून वाहत होती.

पंढरपूर : भीमानदीला नुकत्याच आलेल्या पुराच्या पाण्यामुळे पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांना फटका बसला. यामध्ये शेती आणि पिकांचही मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील नदीकाठच्या सुमारे 20 हजार एकर क्षेत्रावरील ऊस पिकाचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच अडचणीत आलेल्या तालुक्यातील साखर कारखान्यांसमोर पुन्हा ऊसाचे संकट उभे राहिले आहे. 

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता असतानाच पुणे आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे भीमा आणि नीरा नदीला पूर आला होता. पुराच्या पाण्यामुळे पंढरपूर तालुक्यात भीमानदी पूररेषा ओलांडून वाहत होती. तीन ते चार  दिवस आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या सुमारे 40 गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. पुरामुळे घऱांचे व शेतीचेही मोठ नुकसान झाले आहे. पंढरपूर तालुक्यातही यावर्षी शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अशा परिस्थितीमध्ये भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी ऊस पिके मोठ्या हिंमतीने जोपासली होती.

दरम्यान, नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या सुमारे 20 हजार एकर क्षेत्रावरील ऊस पीक बाधीत झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सध्या प्रशासनाकडून युध्द पातळीवर सुरु आहे. आतापर्यंत जवळपास 80 ते 90 टक्के पंचनामे करण्याचे काम संपले आहे. उर्वरित पंचनामे कऱण्याचे काम येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

महूसल विभागाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नदीकाठच्या 40 गावातील सुमारे 20 हजार एकरावरील ऊस पुराच्या पाण्यामुळे बाधीत झालेला आहे. त्यामुळे तालुक्यातील साखर कारखान्यांना ऐन टंचाईच्या काळात एक ते दीड लाख टन ऊसाचा फटका बसणार आहे.

एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे पूर या दुहेरी संकटामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने पूराच्या पाण्यामुळे बाधीत झालेल्या ऊसाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाला केली आहे.

भीमानदीला आलेल्या पूराच्या पाण्याचा तालुक्यातील सुमारे 40 गावांना फटका बसला. यामध्ये सर्वाधिक सुमारे 20 हजाराहून अधिक क्षेत्रावरील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या ऊस पिकांचे पंचनामे कऱण्याचे काम सुरु आहे. दोन ते तीन दिवसात उर्वरित पंचनामे पूर्ण होतील. शासनाकडे नुकसान भरपाई मिळावी असा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. आतापर्यंत पूरग्रस्त लोकांना सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे रोखीने वाटप करण्यात आले आहे.
- मधुसूदन बर्गे, तहसीलदार, पंढरपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 thousand acres of sugarcane crop under flood water in Pandharpur Taluka