निवडणुक निकालाचे अचूक अंदाज वर्तवणाऱ्या ज्योतिषांसाठी चक्क 21 लाखांचे बक्षीस

निवडणुक निकालाचे अचूक अंदाज वर्तवणाऱ्या ज्योतिषांसाठी चक्क 21 लाखांचे बक्षीस

सांगली - निवडणुकीच्या निकालाचे अचूक अंदाज वर्तवणाऱ्या ज्योतिषांसाठी चक्क 21 लाख रुपयाचे बक्षीस अंधश्रद्धा निर्मुलन समितीने ठेवले आहे, अशी माहिती समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

 ज्योतिषशास्त्र ही फसवणूक आहे. २०१४ च्या निवडणुकीत अंधश्रद्धा निर्मूलन  समितीने देशभरातील ज्योतिषांना अचूक उत्तरासाठी २१ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. ते कोणी स्वीकारले नाही. त्यामुळे २०१९च्या निवडणुकीतही भाकीत तंतोतंत सांगणाऱ्या ज्योतिषांना हे आव्हान देत  असल्याची माहिती ‘अंनिस’चे राज्य कार्यवाह डॉ. नितीन शिंदे, प्रा. प. रा. आर्डे, डॉ. संजय निटवे, राहुल थोरात यांनी दिली.

सांगलीतील ज्योतिष संमेलना संदर्भात बोलताना ते म्हणाले,‘‘ज्योतिष संमेलनाला आव्हान देण्याची आमची तयारी होती. गतवेळी पुण्यात ज्योतिषांची पोलखोल केल्यानंतर ते हतबल झाले. त्यांनी आमच्यासमोर सपशेल नांगी  टाकली. अवकाशात लाखो किलोमीटर दूर असलेले ग्रह हे पृथ्वीवरील मानवी जीवनावर परिणाम करतात या चुकीच्या पायावर ज्योतिष सांगितले जाते. त्यांचा पायाच चुकीचा आहे. जगातील १८६ नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांनी १९७५ मध्ये फलज्योतिषाच्या भाकीताला कोणताही आधार नसल्याचा मसुदा बनवला आहे. फोलपणाबद्दल पुरावे दिलेत. तरीही ज्योतिषांकडून जनमानसाच्या असहायतेचा फायदा घेतला जातो.’’

ते म्हणाले,‘‘२०१४ च्या निवडणुकीत देशभरातील सर्व ज्योतिषांना अचूक भाकीत वर्तवण्यासाठी आव्हान दिले होते. शंभर टक्के नाही कमी प्रमाणात देखील उत्तर दिल्यास २१ लाखांचे बक्षीस जाहीर केले. परंतु ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार आणि इतरांनी ते स्वीकारले नाही. या निवडणुकीतही आम्ही आव्हान देत आहोत. मानवी स्वभावाचा फायदा ज्योतिषी घेतात. विज्ञानाच्या कसोटीवर ते शास्त्र टिकत नाही. सहावी-सातवीच्या पाठ्यपुस्तकात ग्रहताऱ्यांविषयी परिपूर्ण माहिती आहे. त्याची विद्यार्थ्यांना खोलवर व प्रत्यक्षात माहिती देण्याची गरज आहे.’’

प्रा. अमित ठकार, डॉ. सविता अक्कोळे, त्रिशला शहा, स्वाती वंजाळे, प्रा. विष्णू होनमोरे, चंद्रकांत वंजाळे  आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com