राजारामबापू कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून 25 कोटींचा घोटाळा

राजारामबापू कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून 25 कोटींचा घोटाळा

इस्लामपूर - सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर सर्वोदयचे नाव वापरुन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने २५ कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. याबाबत सर्वोदयचे प्रभारी कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी आष्टा पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे.

पोलिसांनी चार दिवसात राजारामबापू कारखान्याचे संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अन्यथा कारखान्याचे सभासद आणि सांगली जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यासमोर निदर्शने करणार असल्याची माहिती माजी आमदार संभाजी पवार यांचे पुत्र गौतम पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित होते.
       
गौतम पवार म्हणाले, "राजारामबापू कारखान्याने २००८ मध्ये सर्वोदयसोबत भागीदारी करार केला होता. त्यानंतर सर्वोदय त्यांची रक्कम भरण्यास तयार असूनही त्यांनी ती न स्वीकारता कारखाना आपल्याच ताब्यात ठेवला. कारखान्याबरोबरच त्यांनी सर्वोदयच्या मालकीचा पेट्रोलपंप ही ताब्यात घेतला. केंद्र शासनाच्या नियंत्रणातील इंडियन ऑइल कार्पोरेशन या कंपनी सोबत सर्वोदयचा डीलर म्हणून करार होता. त्यामुळे राजारामबापू कारखान्याच्या प्रशासनाने सर्वोदयच्या नावे पेट्रोलियम पदार्थ खरेदी करून ते राजारामबापू कारखान्याच्या नावे विक्री केले. गेल्या दहा वर्षात २५ ते ३० कोटी रूपयांचा अपहार त्यांनी केला आहे. इंडियन ऑइल कार्पोरेशनशी पत्र व्यवहार करताना त्यांनी सर्वोदयची बोगस लेटरपॅड, बोगस शिक्के वापरले आहेत. काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्यावर दबाव टाकून सह्या करायला लावल्या आहेत.
       
ते म्हणाले, "न्यायालयाच्या निर्णयानंतर गेल्या चार महिन्यापूर्वी आम्ही पेट्रोल पंप ताब्यात घेतला. त्यावेळी पंपातील व्यवहारांचे रेकॉर्ड तपासताना राजारामबापू कारखान्याने बोगस लेटर पॅड आणि बोगस शिक्के वापरुन गैरव्यवहार केल्याचे लक्षात आले. यावर सर्वोदय प्रशासनांनी चौकशी समिति नेमून या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली. त्यावेळी राजारामबापू कारखान्याने बोगस पत्रव्यवहार, बनावट सही, शिक्के, बोगस लेटर पॅड तयार करून पेट्रोलियम पदार्थांची खरेदी सर्वोदय सहकारी साखर कारखाना करत असल्याचे भासवून पेट्रोलियम कंपनीची ही फसवणूक केली आहे. दोन्ही कारखान्याच्या करारातील अट क्रमांक २७ नुसार या पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीतून कमिशनच्या रूपाने मिळणारे उत्पन्न सर्वोदयच्या खात्यावर जमा होणे आवश्यक होते. मात्र राजारामबापूच्या प्रशासनाने संगनमत करून हा अपहार केला आहे. त्यामुळे राजारामबापू कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, स्टोअर इनचार्ज एस. डी. कोरडे, रणजीत पाटील यांच्यासह २३ संचालकांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पोलिसांच्याकडे केली आहे. पोलिसांनी चार दिवसात याबाबत कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com