बेळगावात 30 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

मिलींद देसाई
Saturday, 10 October 2020

रामदुर्ग तालुक्यातील एम तिम्मापूर गावातील 130 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

बेळगाव : राज्यात शाळा कधी पासून सुरू होणार याची जोरदार चर्चा सुरू असतानाच रामदुर्ग तालुक्यातील 30  विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. 
रामदुर्ग तालुक्यातील एम तिम्मापूर गावातील 130 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यावेळी 30 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाल्यानंतर गावातील सर्व लोकांचे विलीगीकरण करण्यात आले. 

विद्यागम योजनेअंतर्गत गावात शिकविण्यासाठी येणाऱ्या 6 शिक्षकांचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे. आपल्या पाल्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पालकांची चिंताही वाढली आहे. तसेच आरोग्य विभागही खडबडून जागे झाला आहे.

हेही वाचा - विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी शिक्षकांची डोंगर कड्यातून पायपीट 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांना गावात जाऊन शिकविण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार शिक्षक गावात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. मात्र विद्यागम योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी शिक्षक शहरातून येत आहेत. त्यामुळेच विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी गावात येऊ नये अशी सूचनाही ग्रामस्थांनी केली. 

त्यामुळे विद्यागम योजनेबाबत पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एम तुम्मापूर जवळील 5 गावांत विद्यागम अंतर्गत विद्यार्थ्यांना मंदिर व इतर ठिकाणी एकत्रित शिकविले जाते. मात्र इतर ठिकाणी काहीही समस्या निर्माण झालेली नाही त्यामुळे विद्यार्थी शिकण्यासाठी एकत्र आल्याने कोरोनाची लागण झाली असा आरोप करणे चुकीचे असल्याचे मत शिक्षण खात्याने व्यक्त केले. मात्र एकाचवेळी 30 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे  

हेही वाचा - पावसाच्या सावटात भातकापणीची घाई 

"गावात कोरोनाची रँडम चाचणी करण्यात आल्यानंतर 30 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. विद्यागम अंतर्गत शिक्षकांना शिकविले जात असल्याची या घटनेशी काहीही संबध नसून गावातील शाळेच्या मुख्याध्यापकांची चाचणीही निगेटिव्ह आली आहे." 

- एम अलासे, गट शिक्षणाधिकारी रामदुर्ग

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 students are corona positive in belgaum teachers also test of corona