सांगलीत 341 कोटींची कर्जमाफी; 62 हजार 689 शेतकऱ्यांना लाभ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत सांगली जिल्हा बॅंकेकडील 62 हजार 689 शेतकऱ्यांना 341 कोटी 48 लाख रुपयांचा लाभ मिळाला.

सांगली : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्हा बॅंकेकडील 62 हजार 689 शेतकऱ्यांना 341 कोटी 48 लाख रुपयांचा लाभ मिळाला. संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. तर अद्याप 2166 शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे जमा होण्याची प्रतीक्षा आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. त्यानुसार दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ केले आहे. एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत ज्या कर्ज खात्यात 30 सप्टेंबरपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची मुद्दल व व्याजासह थकीत असलेली आणि परतफेड न झालेली रक्कम दोन लाखांपर्यंत आहे, असे शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र होते. अशा अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता दोन लाखांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात फेब्रुवारी 2020 मध्ये शासनाने पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती.

जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेत 64 हजार 855 शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी 62 हजार 689 शेतकऱ्यांच्या खात्यावर 341 कोटी 48 लाख रुपये जमा झाले आहेत. उर्वरित 2166 शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा लागली आहे. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाने जानेवारी महिन्यात मागवली होती. त्यामुळे त्यांना उत्सुकता होती. परंतु त्यांच्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

कर्जमाफीची तालुकानिहाय माहितीः 
आटपाडी ः 3063 शेतकरी (17 कोटी 72 लाख रुपये), जत- 12710 (67 कोटी 64 लाख), कडेगाव- 3455 (22 कोटी 90 लाख), कवठेमहांकाळ- 7960 (36 कोटी 69 लाख), खानापूर- 3799 (20 कोटी 25 लाख), मिरज- 8809 (53 कोटी 9 लाख), पलूस- 4217 (25 कोटी 95 लाख), शिराळा- 2677 (10 कोटी 42 लाख), तासगाव- 9331 (53 कोटी 89 लाख), वाळवा- 6668 (32 कोटी 90 लाख) 

पूरग्रस्तांना 80 कोटी मिळाले
पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफी जाहीर केली होती. 105 कोटी रुपये जिल्ह्यात मिळणार होते. त्यापैकी 17 हजार 398 शेतकऱ्यांना 79 कोटी 98 लाख रुपये मिळाले. तर अद्याप 5 हजार 535 शेतकऱ्यांना 25 कोटी 25 लाख रुपये मिळण्याची प्रतीक्षा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 341 crore loan waiver in Sangli; 62 thousand 689 farmers wil get benefit