शिष्यवृत्तीसाठी ३७ हजार विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

जिल्ह्यात रविवारी होणार परीक्षा; २३३ केंद्रे निश्‍चित
सातारा - यंदा प्रथमच पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शालेय शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (ता. २६) होत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा घेण्यात येणार असून, जिल्ह्यातील २३३ परीक्षा केंद्रांवर एकूण ३७ हजार ४२१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 

जिल्ह्यात रविवारी होणार परीक्षा; २३३ केंद्रे निश्‍चित
सातारा - यंदा प्रथमच पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शालेय शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (ता. २६) होत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा घेण्यात येणार असून, जिल्ह्यातील २३३ परीक्षा केंद्रांवर एकूण ३७ हजार ४२१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 

यापूर्वी स्कॉलरशिप परीक्षा ही चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत होती. यंदापासून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही पहिलीच परीक्षा होणार आहे. पाचवीच्या परीक्षेसाठी २० हजार १११, तर आठवीच्या परीक्षेसाठी १७ हजार ३१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) रविवारी घेण्यात येईल. मराठी, ऊर्दू, गुजराती, इंग्रजी, तेलगू, सिंधी व कन्नड या भाषांतून ही परीक्षा होणार आहे. त्याशिवाय सेमी इंग्रजी माध्यमही असणार आहे. या दोन्ही परीक्षांसाठी प्रत्येकी दोन पेपर होणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंत ही परीक्षा होईल. सर्व प्रश्‍न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतील. 

शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी यापुढे पास-नापास घोषित न करता, शिष्यवृत्तीसाठी पात्र किंवा अपात्र असे जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, शिष्यवृती पात्रतेसाठी विद्यार्थ्याला प्रत्येक पेपरला किमान ४० टक्के गुण मिळवावे लागतील. ४० टक्‍क्‍यांपेक्षा कमी गुण असणारे विद्यार्थी अपात्र ठरणार आहेत. 

 ...हे आहे परीक्षेतील नावीन्य
या परीक्षेपासून प्रथमत: बहुसंच (ए, बी, सी, डी) पद्धतीने प्रश्नपत्रिका देण्यात येईल. इयत्ता पाचवीसाठी उत्तराच्या चार पर्यांयापैकी एकच पर्याय अचूक असेल. मात्र, इयत्ता आठवीसाठी प्रत्येक पेपरमध्ये कमाल २० टक्के प्रश्नांच्या बाबतीत दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल. दोन्ही अचूक पर्याय न नोंदविल्यास शून्य गुण दिले जातील. 
 

इयत्ता आठवीसाठी ‘दोन अचूक पर्याय निवडा’ अशी सूचना दिलेल्या प्रश्नाव्यतिरिक्त इतर प्रश्नांना एकापेक्षा जास्त रंगविलेली वर्तुळे ग्राह्य धरली जाणार नाहीत व त्या प्रश्नास शून्य गुण दिले जातील. उत्तरपत्रिका पेपरनिहाय, केंद्रनिहाय वेगवेगळ्या स्वतंत्र पाकिटामध्ये देण्यात येत आहे. उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थींचा आसन क्रमांक व बारकोडची छपाई केलेली आहे.

उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थीचे नाव छापलेले नाही. त्यामुळे परीक्षार्थीच्या प्रवेशपत्रावरून आसन क्रमांकाची खात्री करून उत्तरपत्रिकांचे वितरण करावे. निकाल ‘ओएमआर’ पद्धतीने तयार करावयाचा असल्याने उत्तरपत्रिकांवरील योग्य पर्यायाने वर्तुळ किंवा निळ्या शाईच्या बॉलपेनने पूर्ण रंगवायचे आहे. वर्तुळ चुकीच्या पद्धतीने रंगविल्यास गुणदान होणार नाही.

Web Title: 37 thousand student for scholarship exam