एससी, एसटी, ओबीसीचे उमेदवार देता का उमेदवार?

प्रमोद बोडके
रविवार, 2 डिसेंबर 2018

ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी गावांमध्ये एकीकडे लागणारी चुरस आणि दुसरीकडे आरक्षित प्रवर्गाचा उमेदवार न मिळाल्याने वर्षानुवर्षे रिक्त राहणारी जागा असा विरोधाभास जिल्ह्यात सध्या पाहायला मिळत आहे. आरक्षित जागेवर जिल्ह्यातील 33 गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या 38 जागा रिक्त आहेत.

सोलापूर : ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी गावांमध्ये एकीकडे लागणारी चुरस आणि दुसरीकडे आरक्षित प्रवर्गाचा उमेदवार न मिळाल्याने वर्षानुवर्षे रिक्त राहणारी जागा असा विरोधाभास जिल्ह्यात सध्या पाहायला मिळत आहे. आरक्षित जागेवर जिल्ह्यातील 33 गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या 38 जागा रिक्त आहेत.

आरक्षित जागेवर पात्र उमेदवार मिळत नसल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने या ठिकाणी सातत्याने निवडणूक प्रक्रिया राबविली जाते. जिल्ह्यात अनुसूचित जमातीचे प्रमाण कमी असल्याने अनुसूचित जातीचा उमेदवार विशेषतः महिला उमेदवार शोधण्यासाठी गाव पुढाऱ्यांची धांदल उडत आहे. गावात त्या प्रवर्गाचा उमेदवार नसतानाही पडलेले आरक्षण व उमेदवाराअभावी ग्रामपंचायतीची रिक्त राहिलेली जागा याचा परिणाम गावच्या विकासावर होत आहे. 38 जागांमध्ये अनुसूचित जमातीच्या 20, नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या 14 व अनुसूचित जातीच्या चार जागांचा समावेश आहे. मंगळवेढा, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्‍यात अनुसूचित जमातीच्या जागा सर्वाधिक रिक्त आहेत.

बार्शी तालुक्‍यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा रिक्त आहेत. बार्शी तालुक्‍यातील सर्वाधिक 12, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 11 जागा रिक्त आहेत. माढा, मोहोळ तालुक्‍यातील प्रत्येकी दोन, मंगळवेढ्यातील तीन तर उत्तर सोलापूर व करमाळा तालुक्‍यातील प्रत्येकी एक आरक्षित जागा पात्र उमेदवाराच्या अभावी रिक्त आहे. सोलापूर जिल्ह्यात कोळी समाजाची संख्या मोठी आहे. महादेव कोळी समाजाचे अनुसूचित जमातीचे दाखले अवैध ठरविल्याने जिल्ह्यात या समस्येला सामोरे जावे लागताना दिसत आहे.

गावात कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने पात्र उमेदवार मिळत नाही. नऊ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत एक वर्षापासून तीन जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम निर्णय प्रक्रियेत होत आहे. - विजयकुमार शिंदे, तोगराळी, ता. दक्षिण सोलापूर

Web Title: 38 reserved seats for 33 grampanchayat vacant