esakal | बेळगावातील 40 गावांनी कोरोनाला रोखले वेशीतच! एकही रुग्ण नाही
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगावातील 40 गावांनी कोरोनाला रोखले वेशीतच! एकही रुग्ण नाही

बेळगावातील 40 गावांनी कोरोनाला रोखले वेशीतच! एकही रुग्ण नाही

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील (belgaum) ४० गावांनी कोरोनाला (covid-19) वेशीत रोखले आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही या ४० गावांमध्ये एकही कोरोनाबाधित सापडला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून (health department) मिळाली आहे. यापैकी बहुतेक गावे ही लोकसंख्येने व आकाराने लहान आहेत. शिवाय ही गावे बेळगाव शहरापासून दूर व दुर्गम आहेत. त्यामुळेच या गावांत कोरोना पोहोचला नसावा, असे आरोग्य विभागाला वाटते.

कोरोनाच्या दोन्ही लाटेत संसर्ग थोपविताना अनेक ग्रामपंचायतींची त्रेधातिरपीट उडाली. अनेक उपाययोजना करूनही तेथे कोरोना पोहोचला, पण या ४० गावांनी मात्र कोरोनाला थोपविण्यात यश मिळविले. आरोग्य विभागाने या गावांची विशेष दखल घेतली आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव तालुक्यात १७४ गावे आहेत. त्यापैकी ४० गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. उर्वरित १३४ गावांमध्ये कोरोनाबाधित सापडले आहेत. तालुक्यातील हिरेबागेवाडी व अन्य काही गावे पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती.

हेही वाचा: कामेरीच्या आख्खा मसुराची चवच न्यारी; पण गिऱ्हाईक येईना दारी

२०२० साली कोरोनाचा संसर्ग सुरू झाला, त्यावेळी जिल्ह्यातील पहिले कोरोनाबाधित बेळगाव तालुक्यातच सापडले होते. ३ एप्रिल रोजी ३ कोरोनाबाधित सापडले होते. त्यात बेळगुंदी व हिरेबागेवाडी येथील प्रत्येकी एक, तर शहरातील कॅंप येथील एकाचा समावेश होता. पहिल्या लाटेत हिरेबागेवाडी गावात बाधितांची संख्या मोठी होती. दुसऱ्या लाटेत हिंडलगा, सांबरा गावांत बाधितांची संख्या वाढली. हिंडलगा गावात तर आतापर्यंत तब्बल ४८२ बाधित सापडले आहेत.

सांबरा येथे २६९ बाधित सापडले आहेत. बेळगाव शहरालगत जी गावे आहेत, त्या गावांमध्ये तसेच जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कोरोना संसर्ग वाढला. पिरनवाडी व मच्छे ही दोन गावेही शहरालगत असून, तेथेही दोन्ही लाटेत बाधित मोठ्या संख्येने सापडले. दुसऱ्या लाटेत बेळगाव तालुका हॉटस्पॉट बनला होता. अजूनही चिक्कोडी तालक्यापाठोपाठ बेळगाव तालुक्यातच बाधितांची संख्या जास्त येत आहे.

हेही वाचा: स्पर्धा परीक्षेला राम राम ठोकत शेखरने गाव गाठलं अन् झाला कोट्याधीश

कोरोना संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलेली गावे

सोनट्टी, रामपूर, भरम्यानट्टी, कारवी, कुरविनकोप्प, गोदीहाळ, दासरवाडी, कुरीहाळ खुर्द, कुरीहाळ बुद्रुक, बुड्र्यानूर, सोमनट्टी, करीकट्टी, तुम्मरगुद्दी, यड्डलभावीहट्टी, चंदूर, कलारकोप्प, सिद्दनभावी, अवचारट्टी, गुरनमट्टी, सिद्दनहळ्ळी, होसूर, हुल्यानूर, रंगदोळी, गुट्टी, केंचानट्टी, नंदी, परशेनट्टी, होसहोसूर, वीरनभावी, मल्लहोळी, बामनट्टी, सोनोली, बडस इनाम, सुसगानट्टी, बसवनकोळ्ळ, जानेवाडी, कर्ले, काळेनट्टी, राजहंसगड, कोनेवाडी.

"बेळगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग न झालेल्या गावांची यादी महसूल व आरोग्य विभागाने तयार केली आहे. बेळगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असतानाही ४० गावांनी चांगली कामगिरी केली आहे."

- डॉ. संजय डूमगोळ, आरोग्याधिकारी

loading image