प्लॅस्टिक जप्तीसह 40 हजारांचा दंड ; सांगली महापालिकेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

''प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयानंतर तातडीने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. यापुढे ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे. शिल्लक प्लॅस्टिक पिशव्या तातडीने पालिकेत जमा कराव्यात. नागरिकांनीही कापडी पिशव्यांचा वापर करावा.'' 

रवींद्र खेबुडकर, आयुक्त, महानगरपालिका

सांगली : प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर आजपासून महापालिकेने शहरात धडक कारवाई करत ठिकठिकाणी छापे टाकले. प्लॅस्टिक जप्तीसह 40 हजारांचा दंड व्यापाऱ्यांकडून वसूल केला. गणपतीपेठ परिसरात ही कारवाई करण्यात आली. उद्यापासून ही कारवाई आणखी कडकपणे केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रशासनाच्या धडक कारवाईने प्लॅस्टिक विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. प्लॅस्टिकबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आजपासूनच प्रत्यक्ष कारवाईला प्रारंभ झाला. प्लॅस्टिक पिशव्या आणि अन्य नष्ट न होणारे प्लॅस्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. सकाळी अकरा वाजता आरोग्य विभागाच्या पथकाने गणपती पेठ परिसरातील दुकानांवर छापे टाकले.

पंधरा व्यापाऱ्यांवर छापे टाकण्यात आले. त्यापैकी आठ व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयेप्रमाणे चाळीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला. आयुक्त रवींद्र खेबुडकर व उपायुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याधिकारी सुनील आंबोळे यांच्या विभागाने कारवाई केली.  

यांच्यावर झाली कारवाई - गणपती पेठेतील दुर्गा प्लॅस्टिक, पॉप्युलर बेकरी, राधा किशन ट्रेडर्स, हिरेन मार्केट, आरती प्लास्टिक, शगुन देव पूजा, सागर स्वीट, कृष्णा बेंगलोर बेकरी यांच्यावर कारवाई झाली.

आता टार्गेट...व्यापाऱ्यांच्या कारवाईनंतर आता मंगल कार्यालये, मटण-चिकन मार्केट, मंडई, बाजार येथेही कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  

Web Title: 40 thousand penalty with plastic sangli Corporation