अन्‌ 43 महिलांना घेऊन "ती' धावली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागातर्फे तारकपूर आगारातून खास महिलांसाठी आज नगर-पुणे अशी एसटी बस सुरू करण्यात आलेली आहे. या बसची सुरवात महिला वाहक संध्या हाळगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.

नगर : 'ती' धावणार असल्याने राज्य परिवहन महामंडळाने तसे नियोजन केले होते. ठरलेल्या वेळेनुसार सहा वाजता 'तिचे' पूजन करून श्रीफळ वाढवून तिच्यासह सहभागी झालेल्या 43 महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केल्यानंतर तिने तारकपूरवरून पुण्याच्या दिशेने धावण्यास सुरवात केली. 

राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागातर्फे तारकपूर आगारातून खास महिलांसाठी आज नगर-पुणे अशी एसटी बस सुरू करण्यात आलेली आहे. या बसची सुरवात महिला वाहक संध्या हाळगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. या प्रसंगी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर विभागातर्फे महिलांसाठी बस सुरू करण्याचा निर्णय राज्याला प्रेरणादायी ठरणारा आहे. या ऐतिहासिक बसमधील महिला प्रवांशाचे तिकिट विभाग नियंत्रक विजय गिते यांच्या हस्ते काढून या बससेवेची सुरवात करण्यात आली. 44 प्रवाशी क्षमता असलेली बसला पहिल्याच दिवशी 43 प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला. महिलांसाठी असलेल्या बसमध्ये विशेष करून पुणे येथे शिक्षणासाठी असलेल्या विद्यार्थींची संख्या जास्त असल्याचे दिसून आले. 

उपस्थित अधिकारी 
विभाग नियंत्रक विजय गिते, विभागीय वाहतूक अधिकारी दादासाहेब महाजन, उपयंत्र अभियंता दिलीप जाधव, विभागाचे कर्मचारी वर्ग अधिकारी पोपट घाडगे, आगार व्यवस्थापक अविनाश कल्हापुरे, सहायक वाहतूक अधीक्षक विठ्ठल केंगारकर आदी या वेळी उपस्थित होते. 

दुसऱ्या, चौथ्या शुक्रवारी पुण्यावरून धावणार 
महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी खास महिलांसाठी असलेली बस पुण्यावरून नगरसाठी संध्याकाळी सहा वाजता सुटणार आहे. 

गुलाब पुष्प देऊन सत्कार 
राज्यात नगर विभागाने महिलांसाठी सुरू केलेल्या बसमधील महिला प्रवाशांचा एसटी प्रशासनातर्फे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 

पहिल्या बसचे मानकरी 
महिलांसाठी सोडण्यात आलेल्या पहिल्या बसचे 
चालक म्हणून सतीश सूर्यकांत बोडखे, तर वाहक संध्या सचिन हळगावकर यांना मान मिळालेला आहे. 

महिलांमधून स्वागत 
महिलांचे प्रवासादरम्यान होणारे हाल ओळखून राज्य परिवहन महामंडळाने खास महिलांसाठी बस सोडल्याबद्दल एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून आभार मानण्यात आले. यावेळी महिलांनी महिला वाहक व कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: with 43 women `she run towards pune