चांदोली धरणातून 4.50 टीएमसी पाणी कृष्णेत

शिवाजीराव चौगुले
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

वारणेच्या पाण्याचे मंजूर पाणी वापर नियोजन (टीएमसी मध्ये) 
वारणा सिंचन 8.7,  म्हैसाळ/ कृष्णानदी 3.64 , वाकुर्डे 5.26 एकूण सिंचन 17.87.  पिण्यासाठी 6.365,  औद्योगिक 0.85 एकूण बिगर सिंचन 7.215. बाष्पीभवन तूट 1.27 एकूण 26.352 .उपलब्ध पाणीसाठा 27.523 शिल्लकी साठा 1.171 टीएमसी

शिराळा - चांदोली धरण परिसरात गतवर्षाच्या तुलनेत सध्या 5.38 टीएमसी कमी पाणीसाठा शिल्लक असला तरी रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासूनच सातत्याने कृष्णा नदीवरील म्हैशाळ योजनेसाठी वारणा धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. आज अखेर पर्यंत 4.50 टीएमसी एवढे पाणी सोडण्यात आले आहे.

म्हैसाळला गत वर्षाच्या तुलनेत आत्तापर्यंत 4 टीएमसी. ज्यादा पाणी देण्यात आले आहे. परतीचा पाऊस न झाल्याने म्हैसाळ योजनेला पाण्याची मागणी नेहमीपेक्षा लवकर करण्यात आली आहे. गत वर्षाच्या तुलनेत ज्यादा पाऊस पडूनही साडे पाच टीएमसी पाणीसाठ्याची घट दिसून येत आहे.

सध्या वाकुर्डे योजना सुरू झालेली नाही. या योजनेसाठी असणारा 5.26 टीएमसी पाणीसाठा हा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याने जास्त वापरला जात नाही. सध्या शिल्लक पाणीसाठा कृष्णा नदीवरील वापरासाठी सोडला जात आहे. रब्बी हंगाम संपत आला असून उर्वरित शिल्लक पाणीसाठा उन्हाळी हंगामाकरिता वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

वारणेच्या पाण्याचे मंजूर पाणी वापर नियोजन (टीएमसी मध्ये) 
वारणा सिंचन 8.7, म्हैसाळ/ कृष्णानदी 3.64 , वाकुर्डे 5.26 एकूण सिंचन 17.87. पिण्यासाठी 6.365, औद्योगिक 0.85 एकूण बिगर सिंचन 7.215.बाष्पीभवन तूट 1.27 एकूण 26.352 .उपलब्ध पाणीसाठा 27.523 शिल्लकी साठा 1.171 टीएमसी.

या वर्षी परतीच्या पावसाने दोन महिने ओढ दिल्याने व कृष्णेची लवकर पाणी मागणी आल्याने वारणा धरणाच्या पाणीसाठ्यात गतवर्षाच्या तुलनेत साडेपाच टीएमसी घट झाली असून यावर्षी धरण 100 टक्के भरलेच नाही. 

शिराळा तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याच्या पश्चिम भागातील वारणा धरण हे हमखास भरते. धरणात अतिरिक्त साठा होऊ नये व धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणातून पाणी सोडले जाते. सप्टेंबर, ऑक्टोबरला येणाऱ्या परतीच्या पावसामुळे दोन ते चार टीएमसी वाढ होते. हा धरण प्रशासनाचा अनुभव आहे. त्यामुळे धरण 100 टक्के भरतेच. परंतु यावर्षी परतीच्या पावसाने 1 सप्टेंबरपासून ओढ दिल्याने व या दोन महिन्यात परतीचा पाऊस गृहीत धरून धरण प्रशासनाने केलेले पाणी सोडण्याचे नियोजन कोलमडले.

प्रत्येकवर्षी कृष्णेकडून फेब्रुवारीनंतर पाणी मागणी होते, परंतु यावर्षी पावसाने ओढ दिल्याने ऑक्टोबरपासून पाणी मागणी झाल्याने 10 ऑक्टोबरपासून वारणा धरणातून पाणी सोडण्यास सुरवात झाली. आजअखेरपर्यंत कृष्णेला 4.50 टीएमसी पाणी देण्यात आले आहे. 

गतवर्षी 2345 मीमी पाऊस पडला होता. यावर्षी 2940 मीमी म्हणजे  गेल्यावर्षीपेक्षा 95 मीमी जास्त पडला. हा पाऊस सुरवातीच्या काळात पडला.त्यामुळे त्या प्रमाणात धरणातसाठा करून उर्वरित पाणी सोडण्यात आले. पण परतीच्या पावसाने ओढ दिल्याने ज्यादा पाऊस पडून पाणीसाठा घटला.

पाण्याच्या योग्य नियोजनामुळे पाणी तुटवडा भासणार नाही.
परतीच्या पावसामुळे धरणात जवळपास तीन टीएमसी वाढ होत असते. यावर्षी कृष्णेची मागणी लवकर आल्याने व परतीचा पाऊस न आल्याने पाणीसाठ्यात गतवर्षाच्या तुलनेत घट झाली. तरी पुरेसासाठा असून उपलब्ध पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केले असल्याने पाण्याची पिण्यासाठी व सिंचनासाठी चिंता करण्याची गरज नाही. 
 - प्रदीप कदम, 
शाखा अधिकारी वारणा पाटबंधारे विभाग, वारणावती

Web Title: 4.50 TMC water in Krishna from Chandoli Dam