सातारा जिल्ह्यात ४६ ठिकाणी माती परीक्षण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी विभागाचे पाऊल; तरुणांनाही मिळणार रोजगार

कऱ्हाड - माती परीक्षणासाठी सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी एकच शासकीय प्रयोगशाळा होती. तेथे जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांतून मातीचे नमुने तपासणीसाठी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे त्या वेळी परीक्षण करून मिळत नव्हते. हीच स्थिती राज्यात सर्वत्र होती. त्याचा विचार करून कृषी विभागाने राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्य अभियानातून मृदा परीक्षण (लॅब) सुरू करण्याचे धोरण घेतले आहे.

जिल्ह्यात कृषी विभागाच्या नियंत्रणाखाली ४६ ठिकाणी माती परीक्षण लॅब सुरू करणार आहेत. त्यातून तरुणांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. 
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीतील सुपिकतेचे प्रमाण कमी होऊन ती क्षारपड होत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना जमिनीच्या मागणीनुसारच खते देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यासाठी माती परीक्षण करणे अत्यावश्‍यक झाले आहे. त्यासाठी जिल्ह्याला माती परीक्षणाची एकच प्रयोगशाळा होती. तेथे जिल्ह्यातील सर्व ठिकाणांहून मातीचे नमुने तपासणीसाठी येत. त्याला अनेक दिवसांचा कालावधी लागत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना ज्या वेळी गरज असते, त्या वेळी ते नमुने तपासून मिळत नव्हते. परिणामी शेतकऱ्यांनी एक- दोन डोस टाकल्यानंतरच त्यांच्या मातीचे नमुने तपासून येत होते. परिणामी जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढून ती नापिक होण्यास मदत होत होती.

त्यावर पर्याय म्हणून केंद्र व राज्य सरकारने आता राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्य अभियातून मृदा परीक्षण (लॅब) स्थापना करण्यासाठी योजना आणली आहे. त्यामार्फत कृषी विभागाने माती परीक्षण लॅब सुरू करण्यासाठी जिल्ह्यात ४६ ठिकाणी सोय केली आहे. त्यांच्यामार्फत आता माती परीक्षणाची सोय करण्यात येणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सध्या सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गावात- परिसरातच माती परीक्षण करून घेण्याची सोय होणार आहे. त्यातून त्यांचे पैसे आणि वेळ वाचण्यासही मदत होणार आहे. सध्या संबंधित लॅबधारकांचे प्रशिक्षण व पुढील कार्यवाही सुरू आहे. येत्या काही दिवसांतच संबंधितांची लॅब सुरू होणार आहे. 

माती परीक्षणासाठी शासकीय दरानेच शुल्क आकारणी करावी, असे बंधन संबंधित लॅबधारकांना कृषी विभागाने घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय दरातच त्यांच्या गावात, परिसरात माती परीक्षण करून मिळण्याची सोय होणार आहे.

...येथे होणार माती परीक्षण लॅब
नागठाणे, म्हसवे, सैदापूर, मलकापूर, भोसे, औंध, मिरगाव, लोणंद, असवली, खंडाळा, राजमाची, फलटण, कऱ्हाड, पुसेसावळी, ओझर्डे, खंडाळा, शिवाजीनगर- खंडाळा, मांडवे, मिरजे, वाठार (ता. कऱ्हाड), आनेवाडी, वाठार स्टेशन, राजपुरी, शिरवळ, जवळे, शिरढोण, सुर्ली, पुसेगाव, शिवथर, धामणेर, विडणी, मायणी, चिंचणी, दातेवाडी, आखाडे, नांदगाव- सातारा आणि कोरेगाव येथे माती परीक्षण लॅब सुरू होणार आहेत.

Web Title: 46 place soil testing