४८ अल्पवयीनांच्या पालकांना दंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

वाहतूक शाखेची मोहीम - २४ हजारांची वसुली; हट्टाला घाला आवर

कोल्हापूर - अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणाऱ्या ४८ पालकांवर कारवाईचा दणका शहर वाहतूक पोलिसांनी दिला आहे. त्यांच्याकडून तब्बल २४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. येथून पुढे सातत्याने ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.

वाहतूक शाखेची मोहीम - २४ हजारांची वसुली; हट्टाला घाला आवर

कोल्हापूर - अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणाऱ्या ४८ पालकांवर कारवाईचा दणका शहर वाहतूक पोलिसांनी दिला आहे. त्यांच्याकडून तब्बल २४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. येथून पुढे सातत्याने ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.

एक हजार रुपये दंड दिलात म्हणून सुटला नाहीत, तर तुमची आता जबाबदारी वाढली आहे. विदाऊट गिअर वाहन चालविण्याचा परवाना आता त्या वाहनांबरोबर कालबाह्य झाला आहे. वेळेत मुलाच्या हट्टाला आवर घाला, नाहीतर गोत्यात याल..., असा प्रबोधनाचा डोस शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेल्या पालकांना दिला जात आहे. 

शहरात बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर शहर वाहतूक पोलिसांनी ट्रॅफिक ड्राइव्हअंतर्गत आवर घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकत्याच आलेल्या अध्यादेशानुसार वाहतूक नियमात अनेक बदल झाले आहेत. यापूर्वी १६ ते १८ वर्षांपर्यंतच्या उमेदवाराला विदाऊट गिअर वाहन चालवण्याचा परवाना मिळत होता. त्यासाठी पालकांकडून प्रतिज्ञापत्रही घेतले जात होते. त्या परवानाअंतर्गत शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी वाहन चालविण्याची हौस पूर्ण करत होती. मात्र सध्या विदाऊट गिअर वाहनाचा परवाना फक्त ५० सीसीपेक्षा कमी क्षमता असलेल्या वाहनांसाठीच वापरण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र सध्या सर्वच वाहने ५० सीसीपेक्षा अधिक क्षमतेची असल्याने असा परवाना असूनही त्याचा काहीही उपयोग नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

ट्रॅफिक ड्राईव्ह अंतर्गत सध्या विनापरवाना वाहन चालविणे, कागदपत्रे नसणे, विना अगर फॅन्सी नंबर प्लेटबरोबर वाहन चालविणाऱ्या अल्पवयीनांच्या पालकांवर दडांत्मक कारवाई सुरू केली आहे. 

गेल्या चार दिवसांत एक दोन नव्हे, तर तब्बल वाहन चालविणाऱ्या ४८ अल्पवयीन मुलांना पकडले. त्यातील काही जणांकडे विदाऊट गिअर वाहन चालविण्याचा परवाना होता. मात्र, त्यांच्या हतात ५० सीसीपेक्षा अधिक क्षमतेचे वाहन होते.

मुलगा अल्पवयीन आहे हे माहीत असूनही त्याच्या हातात वाहन देणे जोखमीचे आहे. दुर्दैवाने अपघात झाल्यास त्याला पालकच जबाबदार राहतील. याची जाणीव ठेवून त्यांनी मुलांच्या हट्टाला आवर घालावा. 
- महादेव तांबडे (पोलिस अधीक्षक)

Web Title: 48 parents fine for vehicle