वर्षातल्या 17 दिवसांसाठी 50 कोटींचा घाट! 

वर्षातल्या 17 दिवसांसाठी 50 कोटींचा घाट! 

सातारा - वर्षभरातील १५ ते १७ दिवसांच्या व्यवस्थेसाठी अर्धा अब्ज रुपये खर्च करून सातारा ते घाटाई फाटा या २० किलोमीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा घाट सार्वजनिक बांधकाम विभागाने घातला आहे. रुंदीकरणामुळे दुप्पट रस्ता होणार असला तरी सध्याच्या रस्त्यावर फुलांच्या मोसमातील सार्वजनिक सुट्यांचे दिवस वगळता किती वेळा वाहतूक कोंडी झाली? याकडे डोळेझाक करून चालणार नाही. कोणाचीही मागणी नसताना थोडीथोडकी नव्हे, तब्बल ५० कोटी रुपयांची ही उधळपट्टी कोणाच्या नरड्यात घालण्यासाठी, असा पर्यावरणप्रेमींचा सवाल आहे. 

कासच्या फुलांचा बहर सर्वसाधारणपणे ऑगस्टच्या मध्यापासून ऑक्‍टोबरच्या मध्यापर्यंत टिपेला असतो. या ५० दिवसांच्या बहराच्या काळातच लाखो पर्यटक कासला भेट देतात. ‘युनेस्को’ची मोहर उमटल्यानंतर, गेल्या चार ते पाच वर्षांत येथे पर्यटकांचा ओघ वाढला. हा पर्यटक सार्वजनिक सुटीच्या दिवशी तसेच ‘विक एंड’लाच येतो. एकाच दिवशी पर्यटकांचे लोंढे वाढल्याने मागील दोन-तीन वर्षे वाहतूक कोंडीचे परिणाम सर्वांना भोगावे लागले. एकऐका दिवशी दहा ते १५ हजार पर्यटकांनी पठाराला पाय लावले. 

मात्र, गेल्या वर्षी वन विभाग सुटीच्या दिवशी ‘ऑनलाइन’ नोंदणीबाबत आग्रही राहिल्याने एका दिवशी चार हजारांपेक्षा अधिकच्या येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात आला. त्याचा परिणाम २०१७ या वर्षांत एकही दिवस वाहतूक कोंडी झाली नसल्याचे वन विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट होते. 

कोंडीचे कारण पुढे करून सार्वजनिक बांधकाम विभागाने सातारा ते घाटाईफाटा रस्ता रुंदीकरणाचे नियोजन केले आहे. सर्वच प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाचे धोरण असले तरी आपण करत असलेले काम किती निकडीचे आहे, हे पाहणे आवश्‍यक आहे. फुलांच्या बहराच्या ५० दिवसांच्या कालावधीत ९० टक्के पर्यटक जिल्ह्याबाहेरून येतात. सार्वजनिक सुट्या व विकेंड साजरा करायला येणाऱ्या या पर्यटकांना खऱ्या अर्थाने शिस्त लावण्याचे काम वन विभागाने केले. नियंत्रित पर्यटनाच्या नियोजनामुळे २०१७ च्या मोसमात कास रस्त्यावर वाहतूक कोंडीची एकही घटना  घडली नाही. 

कासचा हंगाम वगळता ऐरवी या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा  प्रसंगच उद्‌भवत नाही. मग ५० कोटी रुपये खर्चाचे रस्ता रुंदीकरण कशासाठी? १५० हून अधिक झाडांचा बळी देणार आहोत का? असा काही सजग सातारकरांचा सवाल आहे. 

दरड कोसळण्याचा लोकवस्तीस धोका
या रुंदीकरणासाठी घाटात काही ठिकाणी डोंगर फोडावा लागणार आहे. झाडे लावून ती जगवण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनुभव वाईट आहे. शपथेवर खोटं बोलण्यात हा विभाग पटाईत आहे. त्यामुळे कासच्या विशिष्ट पर्यावरणाला हे अनावश्‍यक व अनाकलनीय रस्ता रुंदीकरण बाधक ठरणार आहे. घाट रुंदीकरणाचे परिणाम मेगा हायवेवर दरड कोसळण्याच्या प्रकारातून अनुभवतो आहोत. साताऱ्यातील मंगळवार पेठ व महादरे येथील वस्त्यांच्या जिवावर हे रुंदीकरण उठण्याचा धोका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com