सांगलीत एटीएममध्ये पैसे भरणाऱ्यांकडून पन्नास लाखांचा घोटाळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

सांगली - एटीएम मशिनमध्ये पैसे भरणा करणाऱ्या एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांनी पन्नास लाख ५५ हजार रुपयांना गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. सीएमएस इन्फो सिस्टिम एजन्सीचे कर्मचारी हितेश नरसिंह पटेल (रा. पारिजात बंगला, विद्या हौसिंग सोसायटी, शिंदे मळा) व अक्षयकुमार प्रदीप  पाटील (आष्टा, वाळवा) अशी त्या दोघांची नावे आहेत.

सांगली - एटीएम मशिनमध्ये पैसे भरणा करणाऱ्या एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांनी पन्नास लाख ५५ हजार रुपयांना गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. सीएमएस इन्फो सिस्टिम एजन्सीचे कर्मचारी हितेश नरसिंह पटेल (रा. पारिजात बंगला, विद्या हौसिंग सोसायटी, शिंदे मळा) व अक्षयकुमार प्रदीप  पाटील (आष्टा, वाळवा) अशी त्या दोघांची नावे आहेत. एटीएम पैसे भरणा करताना सांगलीसह जयसिंगपूरमधील पाच ठिकाणांहून ही लूट केल्याचे समोर आले आहे. बॅंक शाखा अधिकारी शिवदत्त तुकाराम म्हांगोरे (वय ३४, कोल्हापूर) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ बडोदासह ३४ बॅंकांच्या एटीएम मशिनमध्ये पैसे भरणा करण्याचा ठेका सीएमएस इन्फो सिस्टिम कंपनीकडे आहे. कंपनीचे प्रतिनिधी हितेश पटेल व अक्षकुमार पाटील याच्याकडे सांगली-मिरज आणि जयसिंगपूरमधील अकरा  एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम आहे. यातील संशयित पटेल हा गेल्या बारा वर्षांपासून हे काम करतो, तर पाटील हा गेल्या दीड वर्षांपासून काम करतो आहे. एटीएम मशीनमधील पैसे संपल्यानंतर भरणा करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

दरम्यान, दोघांनीही संगनमत करून पैसे भरणा करताना वेळोवेळी लूट केली. ऑडिट झाल्यानंतर दोघांनाही  पन्नास लाख रुपयांचा घोटाळा केल्याचे पुढे आले. पाच एटीएम मशीनचा यात समावेश आहे. जयसिंगपूरमधील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे मशीन, पटेल चौकातील बॅंक ऑप बडोदाचे एटीएम, माधवनगर आणि झुलेलाल चौकातील स्टेट बॅंक इंडियाचे एटीएममध्ये त्यांनी वेळोवेळी पैसे भरणा करताना लूट केल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, शाखाधिकारी म्हांगोरे यांनी शहर पोलिस  ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोघांनी अपहार केल्याचे तपासात पुढे आहे. 

अशी केली लूट 
बॅंकांच्या एटीएम मशिनमध्ये दररोज पैसे भरणा करण्यासाठी हे दोघे जात होते. त्या वेळी त्यातील रक्कम परस्पर काढून घेतली जात होती. हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. लेखापरीक्षणात रक्कम कमी लागल्यानंतर हा लुटीचा डाव पुढे आला. 

२०१६ मध्ये ३ कोटींवर डल्ला  
सन २०१६ मध्येही याच पद्धतीने लुटीचा प्रकार घडला होता. ३ कोटींच्या रकमेवर डल्ला मारला होता. त्यावेळी सांगलीतील दोघांना अटक करण्यात आली होती.  त्यांनीही याच पद्धतीने लूट केल्याचे पुढे आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 lakh ATM fraud in Sangli