कागलमध्ये प्रधानमंत्री आवासमधून 5 हजार घरे - हसन मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

कागल - कागल शहरातील एकही कुटुंब घरापासून वंचित राहणार नाही. पालिकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवू. योजनेतून कागल शहरात पाच हजार घरे उभारण्याचा संकल्प पूर्ण करणार, असे आश्‍वासन आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले. शहरातील बांधकाम व्यावसायिक, नगरसेवक व पत्रकारांच्या बैठकीत ते बोलत होते. शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. या वेळी मुख्याधिकारी टिना गवळी, उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, रमेश माळी प्रमुख उपस्थित होते.
व्हीआरपी असोसिएटचे युवराज दबडे यांनी या योजनेविषयीची माहिती सांगितली.

श्री. मुश्रीफ म्हणाले, 'योजना चार भागांत विभागली आहे. योजनेंतर्गत लाभार्थ्याला केंद्रशासनाकडून दीड लाख व राज्य शासनाकडून एक लाख असे अडीच लाख रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ कागलवासीयांनी घ्यावा.''

मुश्रीफ म्हणाले, 'पहिला टप्पा झोपडपट्टी विभागासाठी आहे. या योजनेमध्ये झोपडपट्टीची जागा विकसकामार्फत (डेव्हलपर) विकसित करावयाची आहे. लाभार्थ्याला केंद्राकडून एक लाख व राज्याकडून एक लाख असे दोन लाख रुपये अनुदान मिळणार आहे, मात्र एक घर बांधण्यासाठी सुमारे सात लाख रुपये खर्च येतो. दोन लाख वजा जाता उर्वरित रकमेसाठी, विकसकाने जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करावयाचा आहे. त्यासाठी विकसकाला त्या जागेवर आठ मजल्यापर्यंत इमारत बांधता येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील योजना कर्ज संलग्न अनुदान योजना असणार आहे. तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. लाभार्थ्याला साडेपाच टक्‍क्‍यांपर्यंत व्याजदराने सुमारे बारा लाख रुपये कर्ज मिळणार आहे. तिसऱ्या योजनेत सफाई कामगार, विधवा, अपंग, तृतीयपंथी आदींचा समावेश आहे. यामध्ये केंद्राकडून दीड लाख व राज्याकडून एक लाख असे अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे. फ्लॅट घेण्यासाठी कर्जही उपलब्ध होणार आहे. चौथ्या योजनेतही एकूण अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे. स्वत:ची जागा असलेल्यांना घर बांधण्यासाठी हे अनुदान मिळणार आहे.''

या वेळी पंचायत समिती उपसभापती रमेश तोडकर, पक्षप्रतोद प्रवीण काळबर, नगरअभियंता सुनील माळी, नगरसेवक आनंदा पसारे, सौरभ पाटील, सतीश घाडगे, विवेक लोटे आदींसह बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.

संकल्प करणार पूर्ण
मुश्रीफ म्हणाले, 'शहरातील एकही कुटुंब घराविना राहणार नाही, यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. 1002 घरे मंजूर झाली. त्यानुसार 750 घरे बांधून पूर्ण झाली. काहींचे वितरण झाले आहे. शहरात म्हाडाच्या माध्यमातून 700, आयडीपीच्या माध्यमातून एक हजार, विकासकाकडून (डेव्हलपर) 500 व वैयक्तिक एक हजारहून अधिक अशी पाच हजार घरे बांधून दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करणार आहे. त्यासाठी कोणाचीही मदत घेणार आहे.''

Web Title: 5000 home in prime minister avas scheme