जिल्ह्यात वित्त आयोगातून 557 कोटी

सुनील पाटील
रविवार, 23 एप्रिल 2017

ग्रामपंचायतींना बळकटी : 2020 पर्यंत टप्प्याटप्प्याने होतोय निधी वितरित

ग्रामपंचायतींना बळकटी : 2020 पर्यंत टप्प्याटप्प्याने होतोय निधी वितरित
कोल्हापूर - विकासाचे नियोजन गावातच झाले पाहिजे, गाव कारभाऱ्यांनीच या कामाचा आराखडा तयार करावा, यासाठी चौदाव्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यात 2020 पर्यंत 557 कोटींचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या नावावर जमा होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 106 कोटींहून अधिक निधी जमा झाला आहे. त्यामुळे गावागावातील रस्ते, पाणी, विद्युत पुरवठा, गटारांसह इतर विकासकामांना गती येऊन ग्रामपंचायती सक्षम होण्यास मदत होत आहे.

केंद्रीय वित्त आयोगांतर्गत हा निधी वितरित केला जात आहे. 2015-2016 पासून जिल्ह्यातील 12 तालुक्‍यांत लोकसंख्येच्या प्रमाणात या निधीचे वाटप केले जात आहे. यामध्ये सर्वाधिक निधी हा हातकणंगले व करवीर तालुक्‍यांत वितरित केला जाणार आहे. जिल्ह्यात 2015-16 मध्ये बाराही तालुक्‍यांत 66 कोटी 83 लाख 14 हजारांचा निधी वितरित केला आहे. 2016-17 मध्ये 125 कोटी 3 लाख 98 हजार व 2017-18 मध्ये 106 कोटी 92 लाख 16 हजार रुपयांचा निधी वाटप केल्याने गावातील विकासकामांना बळ मिळाले आहे.

ग्रामपंचायतींना निधीसाठी अनेक अवघड मार्ग होते. दरम्यान, ग्रामविकास आणि गाव कारभाऱ्यांनीच स्वत: आराखडा तयार करावा, अशी केंद्र सरकारने योजना आखली आहे. ही योजना सक्षमपणे आणि यशस्विरीत्या राबविली जात आहे. याचा ग्रामपंचायतींना आणि संबंधित ग्रामस्थांना चांगला फायदा झाला आहे. थेट ग्रामपंचायतींच्याच नावावर हा निधी जमा होत असल्याने गावातील रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीट खांबांवर एलईडी बल्ब बसविणे, गटारांची दुरुस्ती करणे, अशी महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागली आहेत. ज्या त्या गावातील ग्रामपंचायत सदस्य प्रभागनिहाय हा निधी वाटून घेऊन विकासकामे करत आहेत.

यावर ग्रामस्थही लक्ष ठेवून आहेत. मिळालेल्या निधीचा योग्य कारणासाठी वापर करावा, यासाठी शासनाकडूनही पाठपुरावा केला जातो. प्रत्येक वर्षी ठराविक रक्कम ग्रामपंचायतीला मिळत असल्याने त्याचा वापरही प्रभावीपणे केला जात आहे. 2020 पर्यंत ही रक्कम मिळत राहणार आहे. त्यामुळे या निधीचा वापर करून गावातील विकास सकारात्मकरीत्या होत असल्याचे चित्र आहे.

चौदाव्या वित्त आयोगातून मिळालेला आणि मिळणारा निधी.
(यामध्ये लाखातील आणि हजार रुपयांपर्यंतच्या रकमेच्या आकड्यांचा समावेश नाही)

तालुका* 2015-16* 2016-17* 2017-18* 2018-19* 2019-20
करवीर* 11 कोटी* 15 कोटी* 17 कोटी* 20 कोटी* 27 कोटी
हातकणंगले* 11 कोटी* 15 कोटी* 17 कोटी* 20 कोटी* 27 कोटी
कागल* 5 कोटी* 7 कोटी* 8 कोटी* 9 कोटी* 13 कोटी
पन्हाळा* 5 कोटी* 8 कोटी* 9 कोटी* 10 कोटी* 14 कोटी
चंदगड* 4 कोटी* 6 कोटी* 7 कोटी* 8 कोटी* 11 कोटी
गगनबावडा* 10 कोटी* 14 कोटी* 16 कोटी* 19 कोटी* 26 कोटी
आजरा* 3 कोटी* 4 कोटी* 4 कोटी* 5 कोटी* 7 कोटी
भुदरगड* 3 कोटी* 5 कोटी* 6 कोटी* 6 कोटी* 9 कोटी
शिरोळ* 7 कोटी* 9 कोटी* 11 कोटी* 13 कोटी* 17 कोटी
गडहिंग्लज* 4 कोटी* 6 कोटी* 7 कोटी* 8 कोटी* 11 कोटी
राधानगरी* 4 कोटी* 6 कोटी* 7 कोटी* 9 कोटी* 12 कोटी
शाहूवाडी* 4 कोटी* 6 कोटी* 7 कोटी* 8 कोटी* 11 कोटी
एकूण* 66 कोटी* 125 कोटी* 106 कोटी* 123 कोटी* 167 कोटी.

Web Title: 557 crore from the Finance Commission in the district