esakal | 'ॲपेक्स' मधील 6 मृत्यूंच्या नोंदीचा घोळ; मृत्यूंची कारणेही गुलदस्त्यात
sakal

बोलून बातमी शोधा

'ॲपेक्स' मधील 6 मृत्यूंच्या नोंदीचा घोळ; मृत्यूंची कारणे गुलदस्त्यात

तारीखनिहाय मृत्यू नोंदी

 • २८ मार्च १

 • ४ मे १७

 • ५ मे ३

 • ११ मे २

 • १७ मे १

 • १८ मे १

 • १९ मे १

 • २० मे १०

 • २७ मे ३५

 • २८ मे ६

 • १ जून १

 • ८ जून १३

'ॲपेक्स' मधील 6 मृत्यूंच्या नोंदीचा घोळ; मृत्यूंची कारणे गुलदस्त्यात

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : मिरज येथील (miraj) ॲपेक्स रुग्णालयात (appex hospital) कोरोनावर उपचार घेत असलेल्या ८७ जणांचा मृत्यू झाला होता. महापालिका आणि पोलिस चौकशीत (miraj police) ते स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाकडे रुग्णालयाने २२ मृत्यूंची नोंद केली आहे. महापालिका जन्म-मृत्यू नोंद विभागात ८१ मृत्यूंची नोंद आहे. एक वेळ जिल्हा प्रशासनाकडे आकडेवारी नाही आली म्हणून तांत्रिक अडचण येणार नाही; मात्र महापालिकेकडे अद्याप सहा जणांच्या मृत्यूच्या नोंदीचा घोळ कायम आहे. काही मृत्यूंचे कारणच देण्यात आलेले नाही.

ॲपेक्स रुग्णालयातील गडबड घोटाळ्यांच्या जितके मुळाशी जावे तितकी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिस तपासातून काही बाबी समोर आल्या आहेत, काही डॉक्टरांची नावेही या प्रकरणाशी जोडली जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी रुग्णांना जीव गमवावा लागलाच, शिवाय त्यांच्या नातलगांना मृत्यूचा दाखला मिळवतानाही संघर्ष करावा लागणार आहे. महापालिकेच्या मिरज कार्यालयातून ‘सकाळ’ने या प्रकरणातील काही महत्त्वाची माहिती मिळवली. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने जन्म-मृत्यू विभागाने ते तितक्याच संवेदनशीलतेने हाताळले आहे.

हेही वाचा: मृतदेहावर 2 दिवस उपचार करणार डॉक्टर अटकेत; इस्लामपुरातील प्रकार

येथील उपलब्ध आकडेवारी, महापालिकेकडून ॲपेक्सला झालेला पत्रव्यवहार आणि मृत्यूच्या नोंदीच्या तारखा पाहिल्यानंतर इथे किती मुर्दाडपणे कारभार सुरू होता, याचा अंदाज येतो. या ठिकाणच्या मृत्यूच्या नोंदी साठवून साठवून घातल्या गेल्याचेही समोर येते. ४ मे रोजी १७ नोंदी, २७ मे रोजी ३५ नोंदी, ८ जून रोजी १३ नोंदी घातल्या गेल्या आहेत. मनपाने ७ मे रोजी या रुग्णालयाने नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नका, असे आदेश दिले होते. त्यानंतरही येथे काम सुरू राहिले. २७ मे रोजी डॉ. महेश जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच दिवशी सर्वाधिक ३५ मृत्यूच्या नोंदी महापालिकेकडे दाखल करण्यात आल्या आहेत.

या मृत्यू दाखल्यांची सविस्तर पडताळणी केल्यास मृत्यू नोंदीस विलंब का केला, याचे कारणही स्पष्ट होईल. या रुग्णालयाने प्रशासनाच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी जिल्हा प्रशासनापासून आकडे लपवले होते. तसेच ते महापालिका जन्म-मृत्यू विभागापासूनही लपवण्याचा प्रयत्न होता का? रुग्णालय बंद करण्याचे आदेश ५ मे रोजी निघालेले असताना ८ जूनला शेवटची मृत्यू नोंद कशी झाली? सगळा गोलमाल आहे.

हेही वाचा: लालपरीचा प्रवास आता कमी खर्चात; एसटी धावणार वीज आणि गॅसवर

loading image