65 एकरात फुलली वनराई ; तीन वर्षे करणार देखभाल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील 65 एकरामध्ये मागील वर्षी विविध प्रकारच्या सुमारे तीन हजार रोपांची लागवड करण्यात आली. येथील सामाजिक वनीकरण विभागाने या झाडांची योग्य ती निगा राखल्याने सध्या हा संपूर्ण परिसर हिरव्या वृक्षराजीने बहरला आहे.

पंढरपूर : चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील 65 एकरामध्ये मागील वर्षी विविध प्रकारच्या सुमारे तीन हजार रोपांची लागवड करण्यात आली. येथील सामाजिक वनीकरण विभागाने या झाडांची योग्य ती निगा राखल्याने सध्या हा संपूर्ण परिसर हिरव्या वृक्षराजीने बहरला आहे. या वनराईतील झाडांची सामाजिक वनीकरण विभाग पुढील तीन वर्षे देखभाल करणार असल्याची माहिती लागवड अधिकारी के. एस. आहेर यांनी दिली. 

दरवर्षी आषाढी व कार्तिकी यात्रेला येणारे लाखो वारकरी व त्यांच्यासोबतच्या दिंड्यांचा 65 एकर परिसरात मुक्काम असतो. या परिसरात प्रशासनाने वारकऱ्यांसाठी विविध सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये दिंड्यांना मुक्कामासाठी प्लॉट्‌स, पिण्याचे मुबलक पाणी, वीजपुरवठा, डांबरी रस्ते, प्रकाशव्यवस्था, पुरेशी स्वच्छतागृहे आदी सुविधांचा समावेश आहे.

मात्र, संपूर्ण 65 एकर परिसरात एकही झाड नसल्यामुळे वारकऱ्यांना कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सामाजिक वनीकरण विभागाच्या साहाय्याने मागील वर्षी जानेवारी महिन्यात 65 एकर परिसरात विविध वृक्षांच्या सुमारे तीन हजार रोपांची लागवड केली होती. यामध्ये गुलमोहर, सप्तपर्णी, बहावा, नांदरूक, कांचन, ताम्हण, मोहगनी, कडुनिंब, पिंपळ, रेन ट्री, बेल, उंबर, कदंब अशा भरपूर सावली देणाऱ्या झाडांचा समावेश आहे.

Web Title: 65 acres of flowers will Care for three years