कोल्हापूर : माले मुडशिंगीत ६९ गावठी बाँब जप्त

69 bomb seized in Hatkanagale Taluka Kolhapur
69 bomb seized in Hatkanagale Taluka Kolhapur

हातकणंगले - माले मुडशिंगी (ता. हातकणंगले) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ६९ गावठी बाँब जप्त केले आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून बाँब निर्मितीचे साहित्य जप्त केले. परिसरात खळबळ उडाली आहे. दोघे घरातच बाँब तयार करीत असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली.

या प्रकरणाचे येथील उजळाईवाडी उड्डाणपूल तसेच हुबळी रेल्वेस्थानकातील स्फोटाशी काही कनेक्‍शन आहे का, याची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. या प्रकरणी विलास राजाराम जाधव आणि आनंदा जाधव (दोघे रा. माले मुडशिंगी, हातकणंगले) यांना अटक केली आहे. या बाँबचा वापर शिकारीसाठी होत असल्‍याची माहिती आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - उजळाईवाडी उड्डाण पुलाखाली शुक्रवारी (ता. १८) रात्री स्फोट झाला. या स्फोटात ट्रकचालक दत्तात्रय गणपती पाटील यांचा मृत्यू झाला. ऐन निवडणुकीत स्फोट झाल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. बाँबशोध व नाशक पथक आणि एसआयटीमार्फत या घटनेचा तपास सुरू होता.

दरम्यान, काल मतदानादिवशीच हुबळी येथील रेल्वे स्थानकावर सापडलेल्या पार्लसमधील संशयित वस्तूचा स्फोट झाला. या स्फोटाचे कोल्हापूर कनेक्‍शन आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक हुबळीत दाखल झाले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या घटनेच्या तपासाबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने याचा समांतर तपास सुरू केला.

शाखेतील कर्मचारी संतोष माने व हरीश पाटील यांना माले मुडशिंगी (ता. हातकणंगले) येथील एका घरात गावठी बाँब तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तेथील एका घरात छापा टाकला. तेथून संशयित विलास जाधव व आनंदा जाधवला ताब्यात घेतले. यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली. त्यात गावठी बाँब तयार करण्याच्या साहित्यासह पांढऱ्या व गडद तपकिरी रंगाचे ६९ जिवंत गावठी बाँब सापडले. ते जप्त करण्यात आले आहेत. 

संशयित विलास व आनंदाकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली. यात त्या दोघांनी घरातच हे बाँब तयार करत असल्याचे सांगितले. त्यासाठी ते सल्फर, पोटॅशियम पावडर, गारगोटीचे खडे आदींचा वापर करत होते. हे बाँब शिकारीसाठी वापरले जातात. त्याला प्राण्यांच्या रक्ताचे आवरण लावून त्याआधारे रानडुकराची शिकार केली जात असल्याची कबुलीही 
दोघांनी दिली. 

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करवीरचे उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, निरीक्षक तानाजी सावंत, सहायक निरीक्षक संतोष पोवार, सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक रमेश ढाणे, किशोर डोंगरे, कर्मचारी संतोष माने, कृष्णात पिंगळे, सोमराज पाटील, संजय पडवळ, सचिन पाटील, किशोर सूर्यवंशी, हरीश पाटील, राजेंद्र घारगे, मनोहर कोळी, राजेश राठोड, संदीप पावलेकर, लक्ष्मण धायुगडे आदींनी केली. 

संशयितांकडे तपास सुरू
संशयित विलास व आनंदा या दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. बाँब तयार करण्याचे साहित्य कोठून आणले, बाँब तयार झाल्यानंतर त्याचा वापर कशासाठी करण्यात आला, बाँब कोणाला विक्री केले, उड्डाणपुलाखाली स्फोटामागे या बाँब काही संबंध आहे का, अशा विविध प्रश्‍नांचा पोलिस तपास करीत आहेत. यातून उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटाचे महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com