अन् त्या पीडित आजी-नातवासाठी धावला देवदूत  

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

औरंगाबाद जिल्ह्यातील डोंगरगाव (ता. सिल्लोड) येथील पीडित दलित कुटुंबाच्या मदतीसाठी बलगवडे (ता. तासगाव) येथील ग्रामस्थांनी धाव घेतली. अमोल थोरात आणि त्यांच्या मित्र परिवाराने 70 हजारांची मदत गोळा करीत या कुटुंबाला आधार दिला. 

सांगली : औरंगाबाद जिल्ह्यातील डोंगरगाव (ता. सिल्लोड) येथील पीडित दलित कुटुंबाच्या मदतीसाठी बलगवडे (ता. तासगाव) येथील ग्रामस्थांनी धाव घेतली. अमोल थोरात आणि त्यांच्या मित्र परिवाराने 70 हजारांची मदत गोळा करीत या कुटुंबाला आधार दिला. 

हे पण वाचा - अंधाना मिळणार वैज्ञानिक दृष्टी

मोलमजुरी करणाऱ्या दलित कुटुंबातील माय-लेकीचे प्रेत आठवड्यापूर्वी विहिरीत आढळले. पोलिसांनी हे प्रकरण आत्महत्येचे असल्याची नोंद करून गुन्हा दाखल केला. परंतु पीडितेच्या कुटुंबीयांनी तिच्यावर बलात्कार करून खुनाचा आरोप केला आहे. त्यांनी संशयितांची नावेही पोलिसांना दिली आहेत. त्या मृत महिलेची वृद्ध आई आणि एक मुलगा एवढंच कुटुंब मागे उरले आहे. आपल्या आई-बहिणीच्या मृत्यूने अबोल झालेल्या या मुलाच्या व वृद्ध आईच्या मदतीची गरज ओळखून अमोल थोरात यांनी गावातील अन्य मित्रांना आवाहन केले. कुटुंबातील सदस्यांना व मित्रमंडळींनी मदतीचा हात दिला. दोन दिवसांत 70 हजार रुपये मदत निधी जमा झाला. हा मदतनिधी घेऊन श्री. थोरात व उदय सकपाळ यांनी तडक डोंगरगाव गाठले. तिथे पीडित कुटुंबातील मुलाला 50 हजारांचा धनादेश दिला. रोख पाच हजार रुपये दिले आणि 15 हजार रुपयांचे घरगुती किराणा सामान, धान्य व कपडे स्वरूपात मदत दिली. थोरात कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक, मुंबई येथील ब्ल्यू चिप कंपनीचे कर्मचारी, पुणे येथील उद्योजक सागर अहिवळे, मुंबई येथील सेल टॅक्‍स ऑफिसर दिलकुश बोले आदींनी मदतीसाठी सहकार्य केले. तसेच सिल्लोड येथील अंनिस कार्यकर्ते प्रा. शिवाजी वाठोरे, सामाजिक कार्यकर्ते कैलाश जगताप यांनी स्थानिक मदत केली. मदतीमुळे पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला. 

हे पण वाचा - धक्कादायक ; येथे पोलिसच शोधत आहेत बनावट पोलिस 
 
""आम्ही जेव्हा त्या आजी व नातवाला भेटलो तेव्हा त्यांचे चेहरे पाहून हृदय पिळवटून गेले. आत्महत्या की खून याबद्दल आत्ताच भाष्य करणे योग्य नाही मात्र त्यांची कथा ऐकून तपास करण्याची भूमिका पोलिसांनी घ्यायला हवी होती. अशा घटना पुरोगामी महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत.'' 
अमोल थोरात, बलगवडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70 thousand rupees help for sangli dongargaon family