"भाऊसाहेबां'च्या इमारतीची लागली वाट 

"भाऊसाहेबां'च्या इमारतीची लागली वाट 

संगमनेर ः शासन व ग्रामीण भागातील जनतेचा दुवा म्हणून काम करणाऱ्या, तलाठी व मंडलाधिकाऱ्यांच्या निवास व्यवस्थेसह लाखो रुपये खर्चून बांधलेल्या तालुक्‍यातील 71 तलाठी कार्यालयांची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. 

संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे सुमारे 35 वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या 2010 ते 2014 या महसूल मंत्रिपदाच्या काळात राज्याच्या महसूल विभागात अनेक आमूलाग्र व धोरणात्मक बदल केले. राजस्व अभियान, संगणकीय सात-बारा, जमीन मोजणी, जागेची नोंदणी व बिगरशेती करणे, तलाठ्यांना लॅपटॉप अशा त्यांच्या कामाची लिम्का बुकला नोंद घ्यावी लागली. राज्याच्या कामाचा कणा असलेल्या महसूल विभागाचे तलाठी व मंडलाधिकारी यांचा ग्रामीण भागातील शासकीय कामांवर मोठा प्रभाव असतो. 

विविध दाखले, उतारे यांपासून आपत्ती निवारण, शासनाच्या योजना ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम हे अधिकारी करतात. हे वेळेवर उपलब्ध न झाल्याने ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेत, त्यांच्या कामात सुलभता येण्यासाठी राज्यातील पहिला तलाठी व मंडलाधिकारी कार्यालय व निवासस्थान एकत्र असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत संगमनेर तालुक्‍यातील 62 तलाठी व 9 मंडळ कार्यालये याप्रमाणे 71 गावांत प्रशस्त इमारती बांधण्यात आल्या. मात्र, गेल्या पाच वर्षांत एकाही ठिकाणी तलाठी किंवा मंडलाधिकारी रहिवास करीत नसल्याने या इमारतींची दुरवस्था झाली आहे. केवळ कार्यालयीन उपयोगासाठी या इमारतीचा तळमजला वापरण्यात येत आहे. 

राज्य शासनाच्या 18 नोव्हेंबर 2011 च्या निर्णयानुसार या प्रत्येकी 80.115 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या 71 इमारतींसाठी 12 कोटी रुपयांची तरतूद असणाऱ्या अंदाजपत्रक व नकाशास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. मात्र, महसूल खात्याच्या मागणीनुसार औरंगाबादच्या वास्तुशास्त्रज्ञांनी मंजूर केलेल्या नकाशानुसार हे काम 107.60 चौरस मीटर इतके वाढवले गेले. यामुळे अंदाजपत्रकी किमतीत वाढ झाल्याने 71 कार्यालयांसाठी 15 कोटी 92 लाख 76 हजार 656 रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यात व्हट्रीफाइड टाइल्स, लॅमिनेटेड दरवाजे, ब्रिक बॅट पद्धतीचे वॉटर प्रुफिंग, छतावर जाण्यासाठी लोखंडी शिडी, कार्यालयासाठी फर्निचर, इमारतीचे विद्युतीकरण, पाणीपुरवठा व मलनिस्सारण, रेनवॉटर हार्वेस्टिंग आदींचा समावेश आहे. 
सर्व सुविधांयुक्त इमारती असूनही, तालुका किंवा मोठ्या शहरात निवास करणाऱ्या शासनाच्या दूतांनी दुर्लक्ष केल्याने अनेक इमारती भिक्षेकरी, गाढवे, भटकी कुत्री, डुकरांचे आश्रयस्थान बनल्या आहेत. या धुळधाणीकडे शासनाचेही दुर्लक्ष झाल्याने या लोकाभिमुख उपक्रमाची 

अंमलबजावणी झाली नाही. पर्यायाने आजही संख्या कमी असल्याने दोन-तीन गावांचा कारभार सांभाळणाऱ्या तलाठ्यांना भेटण्यासाठी ग्रामस्थांचे तालुक्‍याला हेलपाटे सुरू आहेत. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पुन्हा महसूल मंत्रिपद मिळाल्याने, याबाबत मंत्री थोरात काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 
 

संगमनेर तालुका 
महसूल मंडळे ः संगमनेर, धांदरफळ, शिबलापूर, समनापूर, आश्वी, पिंपरणे, साकूर, डोळासणे, घारगाव, तळेगाव 
महसुली सजा ः 61 
तलाठी संख्या ः 48 
मंडलाधिकारी संख्या ः 9 

 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com