शहरातील आठ चित्रपटगृहे झाली बंद

शिवाजी यादव
रविवार, 3 जून 2018

एकाच वेळी अनेक चित्रपट रिलीज होतात. ते पाच, सहा ठिकाणी लागतात. त्यामुळे चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग विभागतो. कुठे, कुठे चित्रपटाला प्रेक्षक नाही, अशी स्थिती होते. एक चित्रपट पाहिला, की दुसरा चित्रपट प्रेक्षक पाहत नाहीत, असेही घडते; मात्र यातून चांगला चित्रपट ठरवूनही पाहता येत नाही.
- विक्रम भोसले, शाहू टॉकीज

मनोरंजनाचे गणितच बदलले आहे. हाऊसफुलचे बोर्ड बॉक्‍स ऑफिसवर झळकत होते. एकेकाळी ब्लॅकने तिकीट घ्यावे लागत होते. आता मात्र मनोरंजनावर मर्यादा आल्या आहेत. मल्टिप्लेक्‍सची संख्या वाढली. परिणामी, शहरातील निम्मी चित्रपटगृहे बंद पडली आहेत. कोल्हापुरात नाटकही दुरापास्त झाले आहे. मनोरंजनावर का मर्यादा आल्या, यावर आजपासून दृष्टिक्षेप...

कोल्हापूर - एकाच वेळी अनेक चित्रपट प्रदर्शित करून, गल्ला जमा करण्याची निर्मात्यांची घाई, शहरातील चित्रपटगृहांची अपुरी संख्या... अशा घोळात एकाच चित्रपटगृहात दोन-तीन चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होत आहेत. यातून चांगला चित्रपट आला, तो पाहण्याअगोदरच गेला असा प्रकार घडत आहे. 

अपवाद वगळता थिएटर मालक, चित्रपट निर्माता, वितरक, महसूल विभाग अशा पातळ्यांवर नफ्याचे गणित फसते आहे. यातूनच कोल्हापुरात सोळापैकी आठ चित्रपटगृहे बंद झाली आहेत.

२० वर्षांपूर्वी शहरातील १६ चित्रपटगृहांत एका वेळी एकच चित्रपट लागलेला असे. किमान चार, पाच आठवडे ते हाऊसफुल्ल ठरत होते. त्यानंतर दहा वर्षांत थिएटर मालकांनी ऑनलाइन तिकिट बुकिंग व सॅटेलाईट, डिजिटल प्रक्षेपण आणि मल्टिप्लेस (बहुपडदे) अशा सुविधा दिल्या. थिएटर चकचकीत, आरामदायी झाले. तिकीट दुपटीने वाढले. प्रेक्षकांनी चांगले चित्रपट पाहण्यासाठी मल्टिप्लेक्‍सला गर्दी केली आहे.  

दहा वर्षांत चित्रपटसृष्टीत जवळपास वर्षाला १८०० ते २५०० कोटींची गुंतवणूक करून, चित्रपट निर्मिती होऊ लागली. हिंदी-मराठी चित्रपटांची लाट आली. एकाच वेळी पाच ते सात चित्रपट प्रदर्शित करण्याची जणू स्पर्धा सुरू झाली. अशात कोल्हापुरात सोळापैकी आठ थिएटर बंद अशी अवस्था आहे. त्यामुळे एकाच चित्रपटगृहात एकाच आठवड्यात दोन, तीन चित्रपट लावावे लागतात. यांतील चांगला चित्रपट प्रेक्षकांपर्यंतच पोचेपर्यंत निघून जातो.

त्यामुळे फावल्या वेळी चित्रपट पाहणे मुश्‍कील झाले आहे. यातून थिएटरमधील तीनपैकी एका चित्रपटाला प्रतिसाद जोरात, तर बाकीच्या दोन चित्रपटांना प्रेक्षक शोधायची वेळ येते.

दृष्टिक्षेपात
तीन मल्टिप्लेक्‍समध्ये ४ ते ६ पडदे
प्रत्येक स्क्रीनवर वेगळा चित्रपट 
मल्टिप्लेक्‍समध्ये तरुणाईची गर्दी
सिंगल स्क्रीनचे थिएटर ६; यांतील तीन चित्रपटगृहांत एकाच वेळी तीन चित्रपट

Web Title: 8 movie theater close in city