पीकविम्याचा ८४ हजार शेतकऱ्यांना आधार

उमेश बांबरे
गुरुवार, 3 जानेवारी 2019

आकडे बोलतात...
शेतकऱ्यांचा सहभाग - एक कोटी ३५ लाख
विमा हप्ता  - ३.९८ कोटी
एकूण विमा हप्ता रक्कम - ८३.३ कोटी
विमा घेतलेले क्षेत्र - ५०,४४५ हेक्‍टर

सातारा - आजवर पीक विमा योजनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचे मन वळविण्यात जिल्ह्यातील कृषी विभाग यशस्वी झाला आहे. या वर्षी तब्बल ८४ हजार ५५२ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विम्यात सहभाग घेतला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती असूनही पिकांची स्थिती चांगली राहून, चांगले उत्पादन पदरात पडण्याची खात्री आहे. तर नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेच तर पीक विमा योजनाच शेतकऱ्यांना तारू शकते, या विचाराने शेतकऱ्यांच्या मानसिकतेत परिवर्तन झाल्याचे चित्र आहे.

विविध नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना शासनाकडे हात पसरावे लागत होते. त्यातूनही मिळणारी भरपाईही तुटपुंजी होती. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने पीक विमा योजना आणली. प्रत्येक वर्षी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांत या योजनेबाबत जागृती करण्याचे काम सुरू होते. पण, शेतकऱ्यांकडून या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत होता. काही शेतकरी पीक कर्ज घेतले नाही म्हणून पीक विम्याकडे दुर्लक्ष करीत होते. तर काही वेळेस पीक विमा भरूनही तुटपुंजी भरपाई मिळेल, अशा हेतूने शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवत होते. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असूनही बहुतांश तालुक्‍यांत रब्बीची पिके चांगली आहेत. त्यातून चांगले उत्पादन मिळण्याची आशा आहे. 

कृषी विभागाने शेतकऱ्यांत पीक विम्याबाबत जागृती करण्यात सातत्य ठेवले होते. यापूर्वी किमान दहा हजार शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी होत होते. पण, यावर्षी कृषी विभागाच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील तब्बल ८४ हजार ५५२ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला आहे. 

यामध्ये पीकनिहाय शेतकऱ्यांची संख्या अशी आहे : हरभरा ६२११(बिगर कर्जदार), भुईमूग २०८ (बिगर कर्जदार), कांदा ३२ (कर्जदार), ११९४ (बिगर कर्जदार), करडई ५८ (बिगर कर्जदार), बागायती ज्वारी १९४६४ (बिगर कर्जदार), कर्जदार केवळ एक. जिरायती ज्वारी ९९४ (बिगर कर्जदार), कर्जदार दोन. गहू बागायती क्षेत्र २३७७ (बिगर कर्जदार), कर्जदार दोन. गहू जिरायती क्षेत्र नऊ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनी एकूण तीन कोटी ९८ लाख ४७ हजार रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. त्यातून ८३  कोटी तीन लाख ३५ हजार ६२२ रुपये भरपाईची रक्कम होत आहे. तर पन्नास हजार ४४६ हेक्‍टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे.
 

पीक विमा योजनेकडे बिगर कर्जदार शेतकरी फारसा सहभाग घेत नव्हते. पण. दुष्काळी परिस्थिती आणि सध्या जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे पीक चांगले असल्याने त्यातून चांगले उत्पादन मिळण्याची शक्‍यता आहे. हे जाणून बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत यावर्षी सहभाग घेतला आहे. याबाबत कृषी विभागाने सातत्याने जनजागृती मोहीम शेतकऱ्यांत राबविली होती. त्याचा हा सकारात्मक परिणाम आहे.
- सुनील बोरकर (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, सातारा)

Web Title: 84000 farmers support crop insurance