
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सांगली जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर नऊशे आरोग्य कर्मचाऱ्यांना आज लस देण्यात आली.
सांगली ः कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर नऊशे आरोग्य कर्मचाऱ्यांना आज लस देण्यात आली. या ऐतिहासिक क्षणाची वाट देशभर पाहिली जात होती. तो दिवस आज उजाडला. सर्वसामान्यांपर्यंत सल तातडीने पोहोचावी, अशी अपेक्षा आहे.
सांगली जिल्ह्यात लसीकरणाचा सुरवात पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते झाला. इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय येथील आरोग्य कर्मचारी गोरखनाथ चंदणशिवे यांना सिरमची कोव्हिशिल्ड ही पहिली लस देण्यात आली. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. आर. देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रम कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणोजी शिंदे, डॉ. अशोक शेंडे उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालयात उभारलेल्या विभागांची पाहणी केली. डॉक्टर, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.
पलूस ग्रामीण रुग्णालयात कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याहस्ते कोरोना लसीकरणाला सुरवात झाली. आमदार अरुणअण्णा लाड उपस्थित होते. कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार सुरेश खाडे यांच्याहस्ते सुरवात झाली. झेडपी अध्यक्षा प्राजक्ता कोरे, सभापती त्रिशल्या खवाटे, डॉ. सावंत, डॉ. ए. आर. शितोळे, डॉ. बी. एल. शेळके उपस्थित होते.
सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील हनुमाननगर येथे आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते लसीकरणास सुरवात झाली. आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील अंबोळे, डॉ. शीतल धनवडे, डॉ. वर्षा पाटील, नोडल ऑफिसर डॉ. वैभव पाटील उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ येथे झेडपी आरोग्य सभापती आशा पाटील, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली, मिरज वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, भारती हॉस्पिटल सांगली, वॉन्लेस हॉस्पिटल मिरज या ठिकाणीही कोरोना लसीकरणाला सुरवात झाली.
लस पूर्णपणे सुरक्षित
कोरोनाची कोव्हिशिल्ड ही लस पूर्णपणे सुरक्षित असून, मला कोणताही त्रास जाणवला नाही. कोरोना लस घेऊन कोरोनामुक्त व्हावे. आपण सुरक्षित तर आपला देश सुरक्षित असेल.
- गोरखनाथ चंदणशिवे, जिल्ह्यातील प्रथम लस लाभार्थी
संपादन : युवराज यादव