पावसाने सर्वाधिक 94 टक्के कापसाचे नुकसान 

सूर्यकांत नेटके
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

ऑक्‍टोबर महिन्यात पावसाने झालेल्या नुकसानीची दाहकता पंचनाम्यानंतर समोर आली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कापसाचे 94.27 टक्के क्षेत्रावर 33 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाले. याशिवाय सोयाबीन, बाजरी, मका व कांदा याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

नगर ः ऑक्‍टोबर महिन्यात पावसाने झालेल्या नुकसानीची दाहकता पंचनाम्यानंतर समोर आली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कापसाचे 94.27 टक्के क्षेत्रावर 33 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाले. याशिवाय सोयाबीन, बाजरी, मका व कांदा याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांना सुमारे दीड हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक फटका बसला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सरकारच्या मदतीचा कितीही टेकू दिला तरी झालेली हानी सहज भरुन निघणार नाही अशी भावना शेतकरी उपस्थित करत आहेत. 

नगर जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात साधारण कापूस, सोयाबीन, बाजरी, भात, मका पिकांचा प्रामुख्याने समावेश असतो. ऑक्‍टोबर महिन्यात सतत झालेल्या पावसाने खरिपातील बाजरी, कापूस, सोयाबीन, तूर, मका, कांदा यासह भाजीपाला, फळबागा यासह रब्बीमध्ये नुकतीच पेरणी केलेल्या ज्वारी, हरभऱ्याचे नुकसान झाले आहे. 

प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार एकट्या नगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने जिल्ह्यातील एक हजार 583 गावांतील सहा लाख 36 हजार 146 शेतकऱ्यांच्या चार लाख 54 हजार 12 हेक्‍टर क्षेत्रावरील शेती पिकांचे 33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यातून म्हणजे तब्बल एक लाख 43 हजार हेक्‍टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. मदतीसाठी पावणे पाचशे कोटी रुपयांची गरज आहे, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप व मुख्यकार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांच्या समितीने दिलेल्या अहवालात नमुद केले आहे. मात्र मिळणाऱ्या मदतीच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक नुकसान झाले आहे. 

खरिपात असलेल्या कापूस, सोयाबीन, बाजरी, भात, मका या प्रमुख पिकांचा नुकसीनीतूनच एक हजार कोटीपेक्षा अधिक फटका बसला असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यामध्ये यंदा पावसामुळे प्रति हेक्‍टरवरील साधारण आठ क्विंटल कापूस वाया गेला. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांना सुमारे पाचशे कोटीचा फटका बसल्याचा अंदाज आहे. 

लागवड केलेल्या क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनचे 79 टक्के नुकसान झाले. त्यामुळे सव्वादोनशे कोटी, बाजरीचे 31 टक्के नुकसान झाले. त्यातून 80 कोटी, भाताचे 72 टक्के नुकसान झाले. त्यातून 40 कोटी, मकाचे 58 टक्के नुकसान झाले असून त्यातून 80 कोटी तर कांद्याचे 79 टक्के क्षेत्रावर नुकसान झाल्याने अडीचशे कोटी रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. इतर खरीप व रब्बीमधील पिके फळबागांचा विचार केला तर नुकसानीचा आकडा पाच हजार रुपयांच्या पुढे जाईल असे सांगितले जात आहे. 

पावसाने सर्वाधिक कापसाचे एक लाख 43 हजार 762 म्हणजे तब्बल 94. 27 टक्के नुकसान झाले आहे. जिल्ह्यामधील पाथर्डी, शेवगाव, जामखेड, पारनेर तालुक्‍यात बहुतांश शेतकरी कापसाच्या अर्थकारणावरच अवलंबून आहेत. 

लागवड क्षेत्राच्या तुलनेत हेक्‍टर क्षेत्रावरील 
पिकांचे नुकसान (कंसात टक्केवारी)
 

भात ः 12770 (72.46), बाजरी ः 50124 (31.28), मका ः 47453 (58.40), कापूस ः 143672 (94.27) , सोयाबीन ः 70691 (79.51), कांदा ः 73872 (79.79), भाजीपाला ः 7965 (43.40), फूलपिके ः 466 (53.89) 

रब्बी पिकांचेही नुकसान 

अवकाळी पावसाने खरिपातील पिकांचे तर नुकसान झालेच, पण रब्बीत पेरलेल्या ज्वारी, हरभऱ्याचेही नुकसान झाले. ज्वारीचे पावसाने 17 हजार 863 म्हणजे पेरलेल्या ज्वारीच्या तुलनेत 9 टक्के तर हरभऱ्याचे 301 हेक्‍टरवर म्हणजे तीन टक्के नुकसान झाले. त्यामुळे रब्बीत नव्याने पेरलेल्या ठिकाणचे नुकसान झाल्याने तेथेही दुबार पेरणी केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 94% of cotton loss due to rainfall