पंढरपूरातील पूरग्रस्तांच्या खात्यावर 97 लाख 50 हजार जमा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

शहर व तालुक्‍यात पुरामुळे नुकसान झालेल्या 975 कुटूंबांच्या बॅंक खात्यावरती 10 हजार रुपयांप्रमाणे 97 लाख 50 हजार रुपये जमा करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली. 

पंढरपूर ः शहर व तालुक्‍यात पुरामुळे नुकसान झालेल्या 975 कुटूंबांच्या बॅंक खात्यावरती 10 हजार रुपयांप्रमाणे 97 लाख 50 हजार रुपये जमा करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली. 

काही दिवसांपूर्वी उजनी आणि वीर धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले होते त्यामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्‍यातील 43 गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नदीकाठावरील अनेक घरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. 

पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना घरातील भांडी, कपडे, घरगुती वस्तूच्या नुकसानीकरीता शासनाच्या वतीने मदत देण्यात येत आहे. पूरस्थितीमुळे तालुक्‍यात एकूण 4 हजार 790 कुटूंब बाधित झाली असून, आतापर्यंत 3 हजार 654 पंचनामे झाले आहेत. त्यापैकी 975 बाधितग्रस्त कुटूंबांच्या बॅंक खात्यावरती 97 लाख 50 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच त्यांना 286.7 क्विंटल गहू व 286.7 तांदूळ पुरवठा करण्यात आला असल्याचेही तहसीलदार बर्गे यांनी सांगितले. 

तालुक्‍यातील पात्र प्रत्येक कुटूंबांला शासनाच्या वतीने मदत देण्यात येणार आहे. ही मदत थेट बाधितग्रस्तांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचेही तहसीलदार श्री बर्गे यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 97 lakh 50 thousand deposit on account of flood victims in Pandharpur