
सुट्टीत मावशीकडे गेलेल्या मुलाचा मावसभावासह वारणा नदीत बुडून मृत्यू
इटकरे : तांदूळवाडी (ता. वाळवा) येथे दोन मावस भावांचा वारणा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. कालपासून शोधमोहीम सुरू होती. आज सकाळी त्यांचे मृतदेह पोलिसांना आढळून आले.
प्रकाश दादू सुतार यांनी कुरळप पोलीसात फिर्याद दिली आहे. अमोल प्रकाश सुतार (वय १६ रा. तांदूळवाडी ) व रवीराज उत्तम सुतार (वय १२ रा. राजमाची ता. कराड) अशी दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रवीराज हा अमोल या आपल्या मावस भावाकडे सुट्टीसाठी आला होता.
काल शुक्रवारी दुपारी बारा वाजता हे दोघे वैरण आणण्यासाठी म्हणून वारणा नदी काठावरील शेतात गेले. त्यांनी थोडी वैरण काढली. रखरखत्या उन्हामुळे आंघोळ करावी म्हणून हे दोघे नदीत उतरले असावेत असा अंदाज आहे. दोघांनाही पोहता येत नव्हते. त्याच वेळी त्यांचा बुडून मृत्यू झाला.
मुले परत आली नाही म्हणून सुतार कुटुंबियांनी काल चार पासून शोधाशोध सुरू केली. कुरळप चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव, उप निरीक्षक विजय पाटील, पोलीस, लाइफ रेस्क्यू फोर्स चे विनायक लांडगे, ग्रामस्थ यांनी घटनास्थळी शोध घेतला. आज सकाळी सुतार यांच्या शेतापासून काही अंतरावर मालेवाडी जॅकवेल जवळ या दोघांचे मृतदेह आढळले. त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.
या घटनेने दोन्हीही सुतार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन्हीही कुटुंबांची सामान्य परिस्थिती आहे. मोल मजुरी करून मुलांचे शिक्षण सुरू होते. अमोल याने दहावीची परीक्षा दिली आहे. तो एकुलता एक होता. रवीराज हा सातवीत होता.