कष्ट, कल्पकतेतून बनते ऊबदार गोधडी

कष्ट, कल्पकतेतून बनते ऊबदार गोधडी

कोल्हापूर - कल्पकता आणि कष्ट याला एका धाग्यात गुंफले, की त्यातून एक सुंदर ऊबदार गोधडी कशी आकार घेऊ शकते, हे राजारामपुरीत पाहायला मिळते. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून आलेला आबाद हुसेन हा कारागीर चक्क रस्त्याकडेला बसून हातमाग चालवत आहे. तो आपल्याकडून जुने कपडे घेतो व आपल्याला त्यातून आपल्यादेखत गोधडी बनवून देतो. एरवी आपण जे जुने कपडे टाकून देणार असतो, त्याच कपड्यातून चक्क गोधडी बनवताना पाहण्यासाठी बाया-बापड्यांचा या कारागिराभोवती रोज घेरा पडतो. 

राजारामपुरी आठव्या गल्लीत कामगार कल्याण हॉलसमोर रस्त्याकडेला एका झाडाखाली आबाद हुसेन या कारागिराने आपला छोटा हातमाग उभारला आहे. तो लोकांकडून त्यांचे जुने कसलेही कपडे घेतो. त्याचे लांब तुकडे करतो व ते तुकडे हातमागावर रंगसंगतीनुसार जोडतो आणि बघता बघता आपल्याच जुन्या कपड्यांपासून तयार झालेली गोधडी हातात देतो. गोधडीबरोबरच तो पसंतीनुसार जाजमही तयार करून घेतो. 

रेडिमेड कपड्यांच्या सध्याच्या जमान्यात बहुतेकांना सुतापासून कापड कसे बनते, हे माहीत नाही. यंत्रमाग राहू दे, हातमाग असतो हेदेखील माहीत नाही; पण मुरादाबादहून आलेला हा कारागीर आपल्यासोबत छोटा हातमाग घेऊन आला आहे. 

घरातील जुने कपडे कोणी टाकत नाहीत आणि वापरतही नाहीत. त्यामुळे कपाटात त्याचा ढीग पडतो. मी या कपड्यातूनच गोधडी, जाजम बनवतो. त्यातून माझे कुटुंब जगवतो आणि आमची पाच पिढ्यांची हातमागाची कलाही जपतो. 
- आबाद हुसेन

कष्टातून गुंफतो जीवनाचा धागा
टाकाऊतून टिकाऊ हेदेखील या निमित्ताने त्यांनी दाखवून दिले आहे. याशिवाय हातमागाची जुनी कला त्यांनी जपली आहे. जगण्यासाठी मुरादाबादहून ते येथे आले आहेत. त्यांच्याकडे कला आहे. कष्टाची तयारी आहे. त्यामुळे ते चक्क हजार-पंधराशे रुपये कमावत आपल्या रोजच्या जीवनाचा धागाही गुंफत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com