'अक्षयवारी'च्या माध्यमातून माऊलींचा पालखी सोहळा आता जगभरात...!

रुपेश कदम
शुक्रवार, 29 जून 2018

कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संत श्री. ज्ञानेश्वर महाराज व इतर संतांचा आषाढीवारी पालखी सोहळा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात सर्वांना अनुभवता येणार आहे.

मलवडी : 'पंढरीच्या सुखा अंतपार नाही लेखा' असे संत तुकाराम महाराज सांगतात. मात्र पंढरीच्या या सुखाचा व वारीचा आनंद प्रत्येकालाच घेता येतो असे नाही. अनेकदा शिक्षण, नोकरी, उद्योग या सर्व कारणांमुळे इच्छा असूनही अनेकांना वारीला जाता येत नाही. मात्र आता काळजी करण्याचे कारण नाही. वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून  अक्षय महाराज भोसले यांनी 'अक्षयवारी' या सोशल मीडियाच्या उपक्रमाद्वारे संपूर्ण पालखी सोहळा व्हाॅटस अॅप वर उपलब्ध केला आहे.

कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संत श्री. ज्ञानेश्वर महाराज व इतर संतांचा आषाढीवारी पालखी सोहळा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात सर्वांना अनुभवता येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशनचे अभ्यासक असणाऱ्या अक्षय महाराज यांचे वारीचे सातवे वर्ष आहे. देगलूरकर परंपरेचे तथा संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक श्रीगुरु श्री चैतन्य महाराज देगलूरकर व श्री. प्रमोद महाराज जगताप यांचे अमूल्य मार्गदर्शन याकरिता लाभत आहे.

शशिकांत काटे, प्रदिप वडणे, ज्ञानेश्वर हरणे, जयश्री पाटील यांनी समन्वयक यात विशेष कार्य करत आहेत. मागील वर्षी या उपक्रमात तब्बल 70 हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. यंदा त्यापैकी जवळपास पाचशेपेक्षा जास्त व्यक्ती अक्षय महाराज यांचेसोबत वारीत सहभागी होत आहेत. वृक्षारोपण, व्यसनमुक्ती व स्त्रीशिक्षण यांसाठी वारकरी संप्रदाय युवा मंचचे महत्त्वपूर्ण कार्य महाराष्ट्रभर सुरु आहे.

Web Title: Aakshaywari through the Mauli Palikhi ceremony