शेटफळेतील गदिमा बंधारा तुडुंब

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

‘सकाळ रिलीफ फंडा’तून केला गाळमुक्त; माळेवाडी, बनपुरीचे बंधारेही भरले

आटपाडी - संपूर्ण आटपाडी तालुक्‍यात गुरुवारी अडीच तास दमदार पाऊस झाला. तसेच रात्रभर रिमझिम पाऊस सुरू होता. गेल्या सात वर्षांतील सर्वांत मोठा पाऊस पडला आहे. या पावसामुळे ‘सकाळ रिलीफ फंडा’ तून गाळमुक्‍त केलेला शेटफळे, माळेवाडी आणि बनपुरीचा बंधारा तुडुंब भरला आहे. भरलेल्या बंधाऱ्यांमुळे दुष्काळी तालुक्‍यातील शेतकरी समाधानी झाला आहे.

आटपाडी शहरासह तालुक्‍यात गुरुवारी झालेल्या पावसामुळे सर्वत्र शेतात पाणी साचले आहे. तसेच आेढे -नाले तुडुंब भरले आहेत. अनेक गावचे बंधारे भरले आहेत. या पावसामुळे रब्बीच्या पेरणीला गती येणार आहे. सकाळ माध्यम समूहाने ‘सकाळ रिलीफ फंडा’तून आणि ‘तनिष्का’ गटाच्या माध्यमातून गाळ काढलेले शेटफळे येथील गदिमा बंधारा, माळेवाडी, बनपुरी, लेंगरेवाडी येथील बंधारे भरून वाऊ लागले आहेत. गाळ आणि चिलार काढल्यामुळे बंधाऱ्यांत पाणीसाठा वाढला आहे. बंधारा तुडुंब भरल्यामुळे शेतकऱ्यांतून ‘सकाळ’चे अभिनंदन आणि समाधान व्यक्‍त केले.

पावसामुळे खरिपाच्या खोळंबलेल्या पेरण्यांना गती येणार आहे.  रब्बी ज्वारी, मका आदींच्या पेरण्या सुरू होणार आहेत. तसेच डाळिंब उत्पादकशेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. आटपाडी तालुक्‍यात गेल्या काही वर्षांतील गुरुवारी मोठा पाऊस झाला. सायंकाळी पाच वाजता पावसाला सुरवात झाली. रात्री सात पर्यंत एकसारखा पाऊस पडत होता. त्यानंतर थोडावेळ विश्रांती घेऊन पुन्हा पाऊस सुरू  झाला. रात्रभर रिमझिम सुरू होती. तालुक्‍यात खरसुंडी, नेलकरंजी, झरे, निंबवडे, दिघंची, राजेवाडी, कौठूळी, आटपाडी, तडवळे, करगणी, गोमेवाडी, शेटफळे आदी भागात हा पाऊस कोसळला. तालुकाभर कमी-जास्त पावसाचे प्रमाण आहे.

‘सकाळ रिलीफ फंडा’तून शेटफळे येथील गदिमा बंधाऱ्यातील गाळ व चिलार काढल्यामुळे गुरुवारी झालेल्या पावसामुळे हा बंधारा तुडुंब भरला आहे. गाळ काढल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ‘सकाळ’मुळे गाव टॅंकरमुक्त होणार आहे. 
- रेश्‍मा क्षीरसागर, सरपंच

शेटफळे येथे तनिष्का गटाच्या विनंतीवरून गदिमा बंधारा गाळमुक्त केल्यामुळे या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. ‘सकाळ’मुळे गावचा पाणी प्रश्‍न मिटला आहे.
- नीता गायकवाड, तनिष्का गटप्रमुख

Web Title: aatpadi sangli news gadima dam full