‘आयुष्यमान’मधील शंभर रुग्णालयांवर कारवाई

तात्या लांडगे
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त या योजनेअंतर्गत आणखी ५०० रुग्णालये आणि २०० आजारांवरील उपचारांचा नव्याने समावेश केला जाणार आहे. योजनेत समावेश असतानाही रुग्णांना सेवा न देणाऱ्या अथवा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जात आहे.
- डॉ. सुधाकर शिंदे, योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी

सोलापूर - देशातील सर्वसामान्यांना मोफत रुग्णसेवा देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ सप्टेंबर २०१८ मध्ये ‘आयुष्यमान भारत’ योजना सुरू केली. त्यामध्ये ४९२ रुग्णालयांचा समावेश करण्यात आला. मात्र, योजनेसाठी पात्र असूनही रुग्णांना सेवा देण्यास नकार देणाऱ्या राज्यातील विशेषत: पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, साताऱ्यातील १०३ रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली. त्यांना दंडही ठोठावण्यात आला असून, आणखी ७० रुग्णालयांची चौकशी सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागातील 
सूत्रांनी दिली.

‘आयुष्यमान भारत’ अंतर्गत महात्मा फुले जनआरोग्य योजनेत राज्यातील सुमारे ८४ लाख कुटुंब पात्र आहेत. ९७१ आजारांवरील उपचारासाठी ४९२ रुग्णालयांची निवड करण्यात आली. मात्र, या योजनेतून लाभ देण्यास रुग्णालयांनी नकार दिल्याने रुग्णांना खासगी दवाखान्याची पायरी चढावी लागली. तर या योजनेसाठी पात्र असूनही काही रुग्णांना लाभ मिळाला नाही. त्याबाबत रुग्णांच्या नातेवाइकांनी थेट केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले. त्यांच्या आदेशानुसार राज्यातील शंभर रुग्णालयांवर कारवाई करण्यात येऊन कोट्यवधींचा दंडही ठोठावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aayushyaman Bharat Scheme Hospital Crime