आबा,जयंतराव,पतंगरावांना आघाडी सरकारचे पाठबळ नव्हते : संजय पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

"सिंचन योजनेतून पाणी दिले अन्‌ संपले असे नाही. पीक नियोजन, प्रक्रिया उद्योग महत्वाचा आहे. टेंभूला 1283 कोटींचा प्रस्ताव मंजुर होत आहे. म्हैसाळसाठी सुधारित आराखडा मंजूर झाला''.

- संजय पाटील, खासदार

सांगली : आरआर आबा, जयंतराव, पतंगरावांसारखे मोठे नेते जिल्ह्यात घडले. मात्र, या तिन्ही मंत्र्यांना केंद्र, राज्य सरकारने हवे तसे पाठबळ दिले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अडचणी सोडवण्यात अडथळे येत राहिले. आता भाजप सरकारमध्ये तसे होत नाही, कृष्णा खोऱ्याच्या विकासाला गती देण्यासाठी सरकार माझ्या पाठीशी आहे, असे मत खासदार संजय पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.

खासदार पाटील यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा बॅंकेतर्फे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, "सिंचन योजनेतून पाणी दिले अन्‌ संपले असे नाही. पीक नियोजन, प्रक्रिया उद्योग महत्वाचा आहे. टेंभूला 1283 कोटींचा प्रस्ताव मंजुर होत आहे. म्हैसाळसाठी सुधारित आराखडा मंजूर झाला. जत तालुक्‍यातील उर्वरीत 42 गावांना पाणी देण्याचे नियोजन करत आहोत. निती आयोगाच्या अहवालानुसार 2030 पर्यंत 40 टक्के लोकांना पाण्याची समस्या भासेल, प्रदुषणाचा विळखा वाढेल. त्यावरही काम करायचे आहे. त्याबाबत मी निती आयोगाशी संपर्क साधून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, उमा भारती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरु आहेत. सरकारचे पाठबळ शंभर टक्के राहील.'' 

दिलीप पाटील म्हणाले, "कार्यकर्त्यांचे मोहोळ जपणाऱ्या संजयकाकांकडून दुष्काळी भागाला मोठ्या अपेक्षा आहेत. ते ताकदीने प्रश्‍न मार्गी लावतील.''

माजी आमदार विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक, प्रा. सिकंदर जमादार, बॅंकेचे सीईओ प्रतापसिंह चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रताप पाटील यांनी स्वागत केले. व्यवस्थापक मानसिंग पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

संचालक बी. के. पाटील, विशाल पाटील, विक्रम सावंत, बाळासाहेब होनमोरे, चंद्रकांत हाक्के, गणपती सगरे, उदयसिंह देशमुख, श्रद्धा चरापले आदी उपस्थित होते. 

Web Title: Aba Jayantrao Patangrao did not support the coalition government says Sanjay Patil