अपक्ष संजय शिंदेंचा अखेर महाविकास आघाडीला पाठिंबा 

अण्णा काळे 
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

  • लोकसभेला राष्ट्रवादीकडून माढ्यात उमेदवारी
  • विधानसभेच्या निकालानंतर भाजपशी जवळीक 
  • महिनाभराच्या सत्ता संघर्षात सावध पावित्रा 
  • सत्तेबरोबर जाणार असल्याचे केले होते जाहीर 

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी अखेर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी त्यांनी शिवसेने, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजुने मतदान केले आहे. 

हेही वाचा : उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री; 169 आमदारांच्या पाठिंब्याने बहुमत सिद्ध 
राष्ट्रवादीचा पाठिंबा
 
आमदार शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातुन ते राष्ट्रवादीकडुन निवडणुक रिंगणात होते. लोकसभेला पराभव झाल्यानंतर मात्र त्यांनी सावध पवित्रा घेत करमाळा विधानसभा अपक्ष लढवली. या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर जिल्हातील बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत व करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन इतर अपक्ष आमदारांबरोबर भाजपला पाठिंबा दिला होता. त्यानंतर महिनाभरापासुन सुरू असलेल्या सत्ता संघर्षात संजय शिंदे कोणती भुमीका घेणार याविषयी कुठलाच निर्णय सांगितला नव्हता. 
हेही वाचा : विधिमंडळात गोंधळ; मुख्यमंत्र्यांच्या विश्‍वासदर्शक ठरावावेळी भाजप सदस्यांचा सभात्याग 
136 व्या क्रमांकाला मतदान
 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचे पुर्वीपासुनच घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे घडलेल्या सत्तातंराच्या नाट्यात त्यांनी महाविकास आघाडी बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे आज स्पष्ट झाले आहे. आज विधानसभेत शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या बाजूने आमदार संजय शिंदे यांनी 136 व्या क्रमांकावर मतदान करत सत्तेबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे सरकार होत नाही हे लक्षात येताच आपण मतदारसंघाच्या विकास कामासाठी सत्तेबरोबर जाणार असल्याचे सोलापूर येथे जिल्हा परिषदे आयोजित सत्कार कार्यक्रमात यापुर्वीच त्यांनी सांगितले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Shinde's support for Mahavikasadhi