'हा'भाजप नेता दाखल करणार अब्रुनुकसानीचा दावा

तात्या लांडगे
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

- विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरेंनी ठाकूर यांच्यानावे केला आरोप
- सोलापुरातील शिवदारे फार्मसी कॉलेजमधील नापास विद्यार्थ्याला पास करण्याचा प्रकार
- कुलगुरुंनी राजकीय दबावापोटी नापास विद्यार्थ्याला पास केल्याचाही केला होता आरोप
- एक कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची आमदार सुजितसिंह ठाकूर​ यांनी​ वकिलामार्फत पाठविली नोटीस

सोलापूर : भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांची पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समिती सदस्य, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. दरम्यान, सोलापुरातील एका फार्मसी महाविद्यालयातील ज्या नापास विद्यार्थ्याला पास केले, तो ठाकूर असून बड्या राजकीय नेत्याचा नातलग असल्याचा आरोप विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद केला होता. डोंगरे यांनी आपले नाव घेतल्याने नाहक बदनामी झाल्याने फौजदारी न्यायालयात खटला भरून दिवाणी न्यायालयात एक कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची नोटीस सुजितसिंह ठाकूर यांनी वकिलामार्फत डोंगरे यांना पाठविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचाच...

aschim-maharashtra/husbands-life-exposed-letter-243393">पत्नीला धक्‍का...अन्‌ एका चिठ्ठीने उलगडले नवऱ्याचे पूर्वायुष्य

सोलापुरातील वि. गु. शिवदारे फार्मसी महाविद्यालयातील द्वितीय व तृतीय वर्षातील एकाच विद्यार्थ्याचे तीन विषयांचे गुण वाढवून त्याला पास करण्यात आले आहे. "ईआरपीएस'मध्ये एमफडणवीस या लॉगिन आयडीचा वापर करून हा बदल करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थी कॉंग्रेसने केला आहे. "एमकेसीएल'मार्फत या प्रकाराची चौकशी व्हावी आणि तोपर्यंत कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा, अशा मागणीचे निवेदन विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख यांनी राज्यपालांना दिले आहे. जिल्ह्यासाठी स्वतंत्र स्थापन झालेल्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील परीक्षा विभागातील गैरप्रकाराची कीड अद्याप हटलेली नाही. परीक्षा नियंत्रकांची नियुक्‍ती होण्यापूर्वी या विभागाचा पदभार कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवला. या काळात नापास विद्यार्थ्याला गुण वाढवून पास करण्याचा प्रकार झाल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकारात एका बड्या राजकीय नेत्याने दबाव आणल्याचाही आरोप त्यांनी केला होता. शुक्रवारी (ता. 13) राष्ट्रीय विद्यार्थी कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांना निवेदन दिले असून त्यावर राज्यपाल काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचाच...अभिनंदन...'या' शेतकऱ्याने वाचवले हजारो रेल्वे प्रवाशांचे जीव

आमदार ठाकूर यांचे नाव घेतलेच नाही
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या गैरकारभारावर प्रकाश टाकण्यासाठी आपण पत्रकार परिषद घेतली. मात्र, त्यामध्ये भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे नाव घेतलेच नाही. दोन दिवसांत त्यांच्या नोटीसीला उत्तर दिले जाईल.
- गणेश डोंगरे, जिल्हाध्यक्ष, विद्यार्थी कॉंग्रेस, सोलापूर

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abrunoqasani claims to be 'ha' BJP leader