'या' कामाचे बक्षीस म्हणून रेल्वे अधिकाऱ्याने घेतली लाच!

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

सोलापूर : रेल्वे डबे स्वच्छ करण्याचे काम मिळवून दिल्याच्या बदल्यात ठेकेदाराकडून तीस हजारांची लाच घेणारा रेल्वेचा डिव्हीजन मेकॅनिकल इंजिनीअर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. दीपक सदाशिव खोत (वय 43, रा. सी रेल्वे क्वार्टर्स, रेल्वे लाईन, सोलापूर. मूळ- डोंगरवाडी ता.वाळवा जि. सांगली) असे अटक केलेल्या रेल्वे अधिकाऱ्याचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी डीआरएम कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. 

गुरुदीप यांना डिव्हीजन मेकॅनिकल इंजिनीअर दीपक खोत याने कलबुर्गी ते हैदराबाद मार्गावर रेल्वे डबे सफाईचे मिळवून दिले होते. हे काम 59 लाख 38 हजार 178 रुपयांचे होते. हे काम मिळवून दिल्याचे बक्षीस म्हणून तसेच यापुढे टेंडरचे बिल काढण्यासाठी मदत करण्यासाठी कामाच्या रकमेच्या एक टक्का म्हणजेच 60 हजारांच्या लाचेची मागणी खोत याने केली. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 30 हजार रुपये घेण्याचे ठरले. 

याबाबत गुरुदीप यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची खात्री केल्यानंतर बुधवारी सायंकाळी एसीबीच्या पथकाने सापळा लावला. तीस हजार रुपयांची लाच घेताना खोत यास रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. 

एसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगदीश भोपळे, कविता मुसळे, सहायक फौजदार निलकंठ जाधवर, पोलिस शिपाई अर्चना स्वामी, उमेश पवार, सिद्धाराम देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: acb trap at solapur drm office