तरुणांची स्टंटबाजी वाहनचालकांच्या जीवावर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

विजयपूर रस्त्यावरून माशाळ वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वाहन चालवून स्टंटबाजीचे प्रकार वाढले आहेत. सेल्फी आणि फोटोग्राफी तरुणांची या रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. 
- शंकर इंगळे, नागरिक 

सोलापूर : विजयपूर रस्ता परिसरातील गणेश निर्मिती विहार परिसरात काल (शुक्रवारी) रात्री झालेल्या अपघातात महापालिका आयुक्तांचे स्वीय सहायक सुनील क्षीरसागर, उपअभियंता विजय राठोड जमखी झाले. यातील क्षीरसागर यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. गतीरोधकांवर तरुण वाहनचालकांकडून स्टंटबाजीचे प्रकार होत असून त्यातूनच हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. 

क्षीरसागर आणि राठोड दोघे दुचाकीवरून घराकडे निघाले होते. काल (शुक्रवारी) रात्री पावणे नऊच्या सुमारास गणेश निर्मिती विहार परिसरात मागून दुचाकीवर तिघे तरुण भरधाव आले. मागच्या दुचाकीने धडक दिल्याने क्षीरसागर आणि राठोड खाली पडले. क्षीरसागर यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागला आहे, तर विजय राठोड यांच्या पायाला जखमी झाली आहे. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणात विजयकुमार बाबूराव राठोड (वय 50) यांनी विजयपूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. अपघातप्रकरणी विष्णू मोहनसिंग चव्हाण, अरुण तेजू पवार (दोघे रा. प्रतापनगर, सोलापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दुचाकीवरून घराकडे जात असताना वळण घेताना विष्णूच्या दुचाकीने मागून धडक दिली. यात दोघे जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निर्मिती विहार परिसरातील रस्त्यांवर नेहमीच तरुणांची स्टंटबाजी चालू असते. यातून अनेक अपघात होत आहेत. शुक्रवारी रात्री झालेला अपघात स्टंटबाजीच्या प्रकारातूनच झाला आहे. पोलिसांनी अशा तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 

ज्या परिसरात क्षीरसागर यांचा अपघात झाला ते ठिकाण सेल्फी पॉईंट झाले असल्याचे समजले. त्या परिसरात वळणाच्या मार्गावर गतीरोधकांची आवश्‍यकता आहे. वाहन चालविताना स्टंटबाजी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई व्हायला हवी. 
- राहुल कुलकर्णी, क्षीरसागर यांचे सहकारी 

विजयपूर रस्त्यावरून माशाळ वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वाहन चालवून स्टंटबाजीचे प्रकार वाढले आहेत. सेल्फी आणि फोटोग्राफी तरुणांची या रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. 
- शंकर इंगळे, नागरिक 

रस्त्यावर वाहन चालविताना प्रत्येकाने काळजी घ्यावी. आपल्या चुकीमुळे अपघात होवू नये यासाठी दक्ष राहायला हवे. विजयपूर रस्ता परिसरात तरुणांकडून वाहन चालविताना स्टंटबाजी होत असेल तर पोलिस त्यावर कारवाई करतील. 
- कैलास काळे, पोलिस निरीक्षक, विजयपूर नाका पोलिस ठाणे

Web Title: acciddent due to youth bike stunt