भीषण अपघातातून केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावले दोघे! 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 January 2021

ट्रॅक्टरच्या चाकात अडकून दुचाकी अक्षरशः चक्काचूर झाली

बेडकिहाळ : शमनेवाडी -बेडकिहाळ सर्कल मार्गावर  खोत यांच्या बंगल्यानजीक  आज (ता. १) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ऊस वाहतूक करणारा  ट्रॅक्टर व दुचाकीचा भीषण अपघात झाला. 

ट्रॅक्टरच्या चाकात अडकून दुचाकी अक्षरशः चक्काचूर झाली. पण केवळ दैव बलवत्तर म्हणून दुचाकीवरील दोघे बचावले. द्रुप हरिभक्त खूशवा व महेंद्र यादव (बिहार) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत  घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,  ट्रॅक्टर (केए २३ टीसी १६७३)सदलगाहून बेडकिहाळ  साखर कारखान्याला ऊस वाहतूक करत होता. याच दरम्यान  साखर कारखान्यात सेंट्रीग व वेल्डींग काम करणारे बिहार येथील कामगार द्रुप हरिभक्त खूशवा व महेंद्र यादव  हे दोघे शमनेवाडी येथील स्टेट बँकेकडून बेडकिहाळकडे  दुचाकीने येत होते. शमनेवाडीपासून बेडकिहाळ सर्कलपर्यंत दुभाजक रस्ता  असल्याने दुचाकी डाव्या बाजूने ओव्हरटेक करून जाण्याच्या प्रयत्न करत असताना पथदीपाच्या खांबाला धडकून दोघे खाली पडले. याच दरम्यान बुवाची सौंदत्तीहून ट्रॅक्टर घेऊन चालक शिवानंद सप्तसागर हा येत होता. दोघे खाली पडल्याच्या काही क्षणात मागून येणार ट्रॅक्टरच्या पुढील दोन्ही चाकात ते सापडले. ट्रॅक्टर चालकाने त्वरित लोडेड ट्रॅक्टरला सिंगल ब्रेकवर घेत दुचाकी घेऊन रस्त्याच्या  कडेला असलेल्या गटारीत वळविली. ट्रॅक्टर चालकाच्या प्रसंगावधाने दुचाकीवरील दोघेही बचावले. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. यामध्ये दुचाकीस्वार चांगलेच  जखमी आहेत. त्यांना त्वरित  शमनेवाडी ग्राम पंचायतीच्या  रुग्णवाहिकेतून उपचारासाठी बेडकिहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. येथे प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे.  उशिरापर्यंत सदलगा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झालेली नव्हती. 

हे पण वाचा पतीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर धक्‍क्‍याने पत्नीचा मृत्यू

 

सर्वजण झाले अवाक्!

दिवसा अपघात झाल्याने त्याची माहिती गावभर पसरली. त्यामुळे लोकांची मोठी गर्दी झाली होती. या वेळी दुचाकीचा झालेला चक्काचूर पाहून सर्वजण अवाक् झाले होते. परिसरात दिवसभर या अपघाताचीच चर्चा रंगली होती.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident bedkihal belgaum