अचानक आडव्या आलेल्या मोटारीला भरधाव दुचाकीची धडक ; अपघातात एकजण जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 January 2021

काम आटोपून ते केएलई रोडवरुन दुचाकीवरुन काकतीकडे परतत होते.

बेळगाव : रस्त्यात अचानक आडव्या आलेल्या मोटारीला भरधाव दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. गुरुवारी (ता.२८) दुपारी २.४५ च्या सुमारास जिल्हा क्रीडांगणासमोर हा अपघात झाला. साईराज संभाजी कडोलकर (वय २२, रा. काकती) असे मृताचे नाव आहे. तर गौतम (वय १७, रा. काकती) असे जखमीचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, साईराज व गौतम वैयक्‍तिक कामासाठी बेळगावला आले होते. काम आटोपून ते केएलई रोडवरुन दुचाकीवरुन काकतीकडे परतत होते. जिल्हा क्रीडांगणाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोटार अचानक रस्त्यावर आडवी आली. त्यामुळे, दुचाकीने मोटारीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार साईराज जागीच ठार झाला. तर मागे बसलेला गौतम गंभीर जखमी झाला. मोटारीच्या समोरील भागाचेही मोठे नुकसान झाले.

हेही वाचा - ब्रेकिंग ; सांगलीत हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय अड्डा छाप्यात पोलिस निरीक्षकालाच बेड्या -

मुख्य रस्त्यावरच अपघात झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती समजताच उत्तर वाहतूक पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीशैल गाबी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जिल्हा रुग्णालयातील शवागृहात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. साईराजच्या मागे आई, वडील, आजोबा, एक भाऊ, काका असा परिवार आहे. अपघाताची नोंद उत्तर वाहतूक पोलिस ठाण्यात झाली आहे. अपघातग्रस्त मोटार मोहन सिद्धाप्पा हुगार (रा. महांतेशनगर) यांच्या मालकीची आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident in belgaum one college student died in accident