उजळाईवाडीजवळ ‘डेंजर झोन’

संजय वर्धन
बुधवार, 4 जुलै 2018

गोकुळ शिरगाव - पुणे-बंगळूर महामार्गावरील लक्ष्मी टेकडीपासून ते उजळाईवाडीपर्यंतचा रस्ता धोकादायक बनला आहे. यामध्ये लक्ष्मी टेकडी, हॉटेल गारवा, मयूर पेट्रोल पंपाची समोरील बाजू आणि मुख्य करून उजळाईवाडीजवळचे एस आकाराचे वळण मृत्यूचा सापळा बनले आहे. एस आकाराच्या वळणावर दोन दिवसांपूर्वीच जवानासह एका तरुणाचा बळी गेला. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.

गोकुळ शिरगाव - पुणे-बंगळूर महामार्गावरील लक्ष्मी टेकडीपासून ते उजळाईवाडीपर्यंतचा रस्ता धोकादायक बनला आहे. यामध्ये लक्ष्मी टेकडी, हॉटेल गारवा, मयूर पेट्रोल पंपाची समोरील बाजू आणि मुख्य करून उजळाईवाडीजवळचे एस आकाराचे वळण मृत्यूचा सापळा बनले आहे. एस आकाराच्या वळणावर दोन दिवसांपूर्वीच जवानासह एका तरुणाचा बळी गेला. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.

उजळाईवाडीजवळील वळणावर अवजड वाहने उलटून वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. एस आकाराच्या वळणावर या महिन्यातील पाचवा अपघात आहे. यामध्ये काहीजण जायबंद झाले तर काहींना जीव गमवावा लागला. त्यामुळे या महामार्गावरील अपघाताच्या या चारही ठिकाणांवर रस्ते विकास महामंडळाने वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. 

येथील अपघाताचे केंद्र बनलेले एस आकाराचे वळण लवकर काढून टाकावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. या वळणावर आतापर्यंत शेकडो अपघात झाले आहेत; पण रस्ते विकास महामंडळाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. अजून किती जीव गेल्यावर रस्ते विकास महामंडळ दखल घेणार आहे,  असा सवाल ग्रामस्थ व वाहनधारकांकडून केला जात आहे.

आठ दिवसांपूर्वीच याच मार्गावर असलेल्या मयूर पेट्रोल पंपासमोर मेंढ्या घेऊन जाणारा टेम्पो उलटून होऊन १२ ते १५ मेंढ्या टेम्पोखाली चिरडून मृत्युमुखी पडल्या होत्या; तर काही महिन्यांपूर्वी एक कंटेनर व जळाऊ लाकूड घेऊन जाणारा ट्रकही पलटला होता; तर एका दुचाकीधारकाचाही या वळणावर मृत्यू झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात आहे.    

त्यामुळे हे वळण कायमस्वरूपी काढण्यात यावे या स्थानिक रहिवासी, वाहनधारक व प्रवाशांच्या मागणीकडे का बरे दुर्लक्ष केले जातेय असा प्रश्न पडतो आहे. उजळाईवाडीलगत असलेल्या एस कॉर्नरवर वाहनांना वेग आवरता येत नाही; त्यामुळे वाहने वळणावरून सरळ पुढे जाण्याऐवजी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटतात.

अपघाती वळण
शेकडो अपघात होऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष
अवजड वाहने उलटून वारंवार वाहतुकीची कोंडी 
वळण काढून टाकण्याची ग्रामस्थ, वाहनधारकांची मागणी

महामार्गावरील खचलेल्या साईड पट्ट्यांमुळे पादचाऱ्यांना पर्याय म्हणून महामार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेक वेळा निवेदन देऊनही गोकुळ शिरगावजवळ उड्डाण पूल झालेला नाही. अरुंद रस्ते आणि रस्त्यावरील अतिक्रमणे यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. वळण तातडीने काढून टाकावे.
- महादेव पाटील, सरपंच, मेजर राजन पाटील (गोकुळ शिरगाव)  

Web Title: accident dangerous turn highway