esakal | लग्नासह, घराचं स्वप्न राहिलं अधुरं; आजीसह नातवाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नासह, घराचं स्वप्न राहिलं अधुरं; आजीसह नातवाचा मृत्यू

शांतव्वांचा पती दुंडाप्पा बस्तवाडी यांचे वर्षभरापूर्वीच निधन झाले आहे. तर काही वर्षांपूर्वी राजश्री यांच्या पतीचे निधन झाले आहे.

लग्नासह, घराचं स्वप्न राहिलं अधुरं; आजीसह नातवाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संकेश्वर : येथील मड्डी गल्लीतील रेणुका मंदिराजवळील एका घराच्या मागच्या अंगणात तीन जणांना विजेचा शॉक लागला. त्यात आजीसह नातवाचा मृत्यू झाला असून सून गंभीर जखमी आहे. रविवारी (३) सकाळी ही घटना घडली. शांतव्वा दुंडाप्पा बस्तवाडी (वय ९०) आणि सिद्धार्थ बापू बस्तवाडी (वय २४) असे मयत आजी व नातवाचे नाव आहे. राजश्री बापू बस्तवाडी ही सून गंभीर जखमी असून हात जळाला आहे. संकेश्वर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शांतव्वा बस्तवाडी यांच्या घराच्या अंगणात अनेक फुलझाडे आहेत. देवपूजेसाठी रोज सकाळी फुले आणण्यासाठी शांतव्वा जातात. संकेश्वर येथे रविवारी (२) पाऊस झाला होता. विद्युत वाहिनीचा स्पर्श फुलझाडांना झाला होता. फुले तोडताना विजेचा स्पर्श त्यांना होऊन खाली कोसळल्या. त्यानंतर नातू सिद्धार्थ बस्तवाडी याने धाव घेतली. त्यालाही शॉक लागला. त्यात आजी व नातवाचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा: राज्यावर आस्मानी संकटाचे ढग; पुढच्या 4 दिवसात मुसळधार - IMD

सून राजश्री बापू बस्तवाडी यांना घटनेची कल्पना येताच दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही जोराने शॉक लागला. त्यामुळे त्या बाजूला उडून पडल्या. त्यात हात जळाला असून गंभीर जखमी आहेत. त्यांनी जोराने आरडाओरड करताच आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली. हेस्कॉमच्या कार्यालयास कळवून विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. संकेश्वर पोलिसांना माहिती मिळताच उपनिरीक्षक गणपती कोगेनहळ्ळी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

शांतव्वा व सिद्धार्थ यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले. सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. जखमी राजश्री यांना रुग्णालयात नेऊन प्रथमोपचार करण्यात आले. त्यांचा हात जळाला असून सध्या घरी उपचार सुरू आहेत. सिद्धार्थाच्या मागे आई व भाऊ असा परिवार आहे. संकेश्वर पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

बस्तवाडी कुटुंबावर शोककळा

शांतव्वांचा पती दुंडाप्पा बस्तवाडी यांचे वर्षभरापूर्वीच निधन झाले आहे. तर काही वर्षांपूर्वी राजश्री यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यामुळे शांतव्वाही सून व दोन नातवंडांसमवेत राहत होती. आता अचानकपणे दोघे निघून गेल्याने बस्तवाडी कुटुंबावर शोककळा पसरली असून शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Mumbai Drug Case: खरा रिपोर्ट समोर येऊ द्या! अभिनेता सुनील शेट्टीचं व्टिट

लग्नासह, घराचे स्वप्न अधुरे

सिद्धार्थ याने निडसोशी कॉलेजमधून पॉलिटेक्निक डिप्लोमा पदवी घेतली असून सध्या तो शेती करत होता. जुने घर पाडून नवीन घर बांधण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी साहित्यही स्थलांतरित करण्यात येत होते. शिवाय लग्नही ठरवण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र काळाने अचानक घाला घातल्याने लग्नासह घराचे स्वप्न अधुरे राहिले आहेत.

loading image
go to top