जत - डफळापूर रस्त्यावर अपघातात दोन ठार; दोन जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

  • जत-डफळापूर रस्त्या दरम्यान खलाटी हद्दीतील वळणावर दोन दुचाकी व सिमेंट बंकर ट्रकचा समोरासमोर अपघात
  • यात एकाचा जागीच तर एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू
  • मोहन महादेव भंडारे (वय 30) व तुषार प्रताप भंडारे (वय 21) असे मृतांची नावे

 

जत - जत-डफळापूर रस्त्या दरम्यान खलाटी हद्दीतील वळणावर दोन दुचाकी व सिमेंट बंकर ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. यात एकाचा जागीच तर एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. मोहन महादेव भंडारे (वय 30) व तुषार प्रताप भंडारे (वय 21) असे मृतांची नावे आहेत. गुरूवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. हे सर्व जखमी तासगाव तालुक्‍यातील येळावी गावचे रहिवासी असून जत तालुक्‍यातील कोळगिरी येथे लग्न कार्यासाठी निघाले होते. 

ऋषीकेश राजू भंडारे, अनिकेत विकास भंडारे अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत ट्रक चालक राजेंद्र महादेव होळकर (वय 33, रा. डिसकळ, ता. सांगोला) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत जत पोलिसात लक्ष्मण भंडारे (रा. येळावी) याने फिर्याद दिली. 

अधिक माहिती अशी की, हे सर्वजण दुचाकीवरून (एम. एच. 10,सीझेड.7125) व (एम. एच. 10,सीझेड, 8835) कोळगिरी येथे मुलीच्या लग्नासाठी येळावीहून निघाले होते तर सिमेंटचा बल्कर  ट्रक (एन.एल.01.एसी.6308) डफळापूरच्या दिशेने निघाला होता. खलाटी हद्दीतील मोबाईल टॉवर जवळ वळनावर दोन्ही दुचाकी व ट्रकचा समोरासमोर अपघात झाला.

दरम्यान, एका गाडीवरील मोहन व तुषार भंडारे तर दुसऱ्या गाडीवर राजु व अनिकेत भंडारे होते. यातील मोहन याचा डोक्‍यात, पोटात जोरात मार लागून जागीच मृत्यू झाला व तुषार याच्या डोक्‍यातील कवटी क्रॅक होऊन गंभीर दुखापत झाल्याने त्याला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. जखमी दोघांवर उपचार सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on Jat Dhalapur Road two dead