सौंदलग्याजवळील अपघातात बसर्गेतील जवान ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

निपाणी - पुढे जाणाऱ्या वाहनाला दुचाकीने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील जवान ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता. 20) रात्री उशिरा घडली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलग्यानजीक हा अपघात झाला. अण्णासाहेब रामगोंडा शिक्रे (वय 25, रा. बसर्गे, ता. गडहिंग्लज) असे मृत जवानाचे नाव आहे. 

अण्णासाहेब शिक्रे हे कोल्हापूर मराठा लाईट इन्फट्री येथे जवान म्हणून कार्यरत होते. ते रजा काढून आपल्या मूळ गावी बसर्गे येथे गेले होते. गुरुवारी रात्री ते दुचाकीवरून (एमएच 09 एए 5777) कोल्हापूरकडे निघाले होते. सौंदलगा-आप्पाचीवाडी फाटा रस्त्यावर पुढे जाणाऱ्या अनोळखी वाहनाला दुचाकीची जोराची धडक बसली. या अपघातात शिक्रे यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पुंज लाईडच्या भरारी पथकातील शरीफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. 

मृत जवान शिक्रे यांचा सहा महिन्यापूर्वी विवाह झाला होता. त्यांच्या अकाली निधनामुळे शिक्रे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची माहिती मिळताच बसर्गे गावावर शोककळा पसरली आहे. मंडल पोलिस निरीक्षक किशोर भरणी, सहाय्यक फौजदार के. एस. कल्लापगौडर, हवालदार एम. आर. हंची व सहकार्यानी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शुक्रवारी दुपारी गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. मृत शिक्रे यांच्या मागे आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. 

Web Title: accident near Soundalga Jawan dead