दिवाळीसाठी आलेल्या विवाहितेचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

- गुरुनानक चौकात दुचाकीला मालट्रकची जोरात धडक

सोलापूर : दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या शुभांगी बनकर (वय-30) यांचा शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. वडिलांसमवेत दुचाकीवरुन जाताना गुरुनानक चौक परिसरात मालट्रकने जोरात धडक दिली. त्यामध्ये शुभांगी यांचा जागीच मृत्यू झाला तर वडिल गंभीर जखमी झाले आहेत.

दुचाकीवरुन वडिलांसमवेत घराकडे जात असताना विजयपूरहून हैदराबाद रस्त्याकडे जाणाऱ्या मालट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत शुभांगी खाली पडल्या अन्‌ गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

मयत शुभांगी या पुण्यातील रहिवाशी आहेत. दिवाळी सणानिमित्त त्या काही दिवसांपूर्वी माहेरी आल्या होत्या. दिवाळीनंतर आता सासरी जाण्याच्या तयारीत होत्या. काही वस्तू खरेदी करुन वडिलांसमवेत दुचाकीवरुन त्या घराकडे निघाल्या होत्या. त्यावेळी हा अपघात घडल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidental death of a married women in Solapur