सांगली जिल्ह्यात चिकुणगुनियाची साथ 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

या परिस्थितीत डास नियंत्रणासाठी ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. हे प्रयत्न युद्धपातळीवर झाले पाहिजे. नागरिकांनी घरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.

सांगली ः एकीकडे कोरोना आजाराने थैमान घातलेले असताना जिल्ह्यात चिकुनगुणियाची साथ वेगाने पसरायला लागली आहे. महापालिका क्षेत्रासह गाव, खेड्यांत रुग्ण आढळू लागले आहेत. गंभीर बाब म्हणजे या रुग्णांना तपासण्यासाठी आणि औषधोपचारासाठी पुरेसी वैद्यकीय सेवाच उपलब्ध नाही. त्यामुळे सारे लोक हैराण झाले आहेत. 

जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात चिकुनगुणियाचे किती रुग्ण आहेत, याची अधिकृत आकडेवारी तूर्त वैद्यकीय यंत्रणेकडे नाही. या सर्व व्यवस्थेचे संपूर्ण लक्ष या घडीला कोरोना नियंत्रणाकडे लागलेले आहे. अशावेळी साथीच्या या गंभीर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांची मात्र अवस्था बिकट झाली आहे. अनेक रुग्णालयांना कोविडची सुविधा उपलब्ध केले आहे. तेथे अन्य तपासण्या जवळपास थांबल्या आहेत. त्यामुळे तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत, अशी काही परिस्थिती राहिलेली नाही. प्रचंड अंगदुखी, थांबून थांबून ताप येणे अशा लक्षणाने लोक बेजार आहेत. 

जिल्हा परिषदेकडून या रुग्णांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. आता सध्या तेथे कोरोनाची चाचणी सुरु असल्याने या तपासण्या जवळपास ठप्प आहेत. त्यामुळे आकडेवारी उपलब्ध नसली तरी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यात शहरी भागातही रुग्णसंख्या मोठी आहे. वसंतदादा शासकीय रुग्णालयात दररोज नवीन रुग्ण दाखल होत आहेत. त्यांच्यावर उपचारासाठीही खाटा उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. 

या परिस्थितीत डास नियंत्रणासाठी ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. हे प्रयत्न युद्धपातळीवर झाले पाहिजे. नागरिकांनी घरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. या गंभीर परिस्थितीत आजारी पडणे परवडणारे नाही. वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत. त्या कोलमडल्या आहेत. त्यामुळे चिकुनगुणियाच्या अनेक रुग्णांवर घरीच उपचाराची वेळ आली आहे. 
 

हे करावे लागेल 
* पाणी साचून राहणार नाही हे पाहा 
* आठवड्यातून कोरडा दिवस पाळा 
* डास नियंत्रण हाच उपाय 
* टायरी, टाकावू वस्तू साचू देऊ नका 
* पाणीसाठे झाकून ठेवा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accompanied by Chikungunya in Sangli district